Sunday, April 2, 2023

जिल्हाधिकारी, एसपींच्या हस्ते प्रतापगडावर शिवप्रताप दिनास सुरूवात

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
ढोल, ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिक आणि अलोट गर्दीच्या उत्साहात आज (बुधवार) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होत आहे. आज (बुधवार) पहाटेपासूनच मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमींनी परिसर भारुन गेला आहे. सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा बांधण्यात आली. जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगवा ध्वज फडकवण्यात आला. मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमा झालेले हजारो शिवभक्त व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, स्वराज्य मराठा ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतापगडावर दाखल झाले आहेत. या शिवप्रताप दिनास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहिले असून खा. छ. उदयनराजे भोसले हे मात्र अनुपस्थित असल्याचे दिसून आले.