औरंगाबाद | 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये रोहयो कामांच्या लेबर बजेटची आखणी करण्याची सूचना राज्याचे मृद, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात रोहयो कामांच्या लेबर बजेट बद्दल विभागीय आयुक्तालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. ‘रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकचे काम देऊन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.’ असे सचिव नंदकुमार म्हणाले.‘रोहयोत प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात जास्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.’ असे आयुक्त गोयल म्हणाले.
‘गावातील प्रत्येक कुटुंबाला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयांपर्यंत मिळायला हवा यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर नियोजन करावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येऊन त्यांची आर्थिक उन्नती साधावी,’ अशा सूचना नंदकुमार यांनी यावेळी केल्या.यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर रोहयोचे आयुक्त शंतनू गोयल, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, जालनाचे प्रताप सवडे, परभणीचे शिवानंद टाकसाळे, नांदेडच्या वर्षा ठाकूर, हिंगोलीचे आर.बी. शर्मा, लातूरचे अभिनव गोयल, बीडचे अजित कुंभार, उस्मानाबादचे राहुल गुप्ता, उपआयुक्त समीक्षा चंद्राकर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, कृषी अधिकारी पी.एस.शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे यांची उपस्थिती होती.