काँग्रेसचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संख्याबळामुळे विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसच्या (Congress)  ताब्यात गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याला विरोधी पक्षनेत्याचे पद सोपवले जाईल याबाबत चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदासाठी ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची निवड केली आहे.

नुकतीच काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पद विजय वडेट्टीवार यांना देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पदासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी आपला वशिला लावला होता. परंतु या सगळ्यांत विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांनी बाजी मारली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासोबत संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांची नावे विरोधी पक्षनेते पदासाठी सुचवण्यात आली होती.  अखेर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असताना देखील काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते पद कोणाकडे जाईल हे जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु आज अखेर काँग्रेस हायकमांडनेच विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदासाठी निवड केली आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते दुसऱ्यांना भूषवत आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये देखील त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी होती. आता पुन्हा त्यांना हे पद सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्यावर विश्वास दाखवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विजय वडेट्टीवार ओबीसी नेते असून मतदार संघात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. विजय वडेट्टीवार यांनी आजवर काँग्रेसचा विश्वास राखून अनेक पदांची धूरा सांभाळली आहे. आता पुन्हा काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवला असून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांना सोपवली आहे.