औरंगाबाद : सोमवारी पालकमंत्री तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. मात्र या कार्यक्रमाबाबत काँग्रेस अनभिज्ञ असून अजूनपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेसच्या नेत्यांना मिळालेले नाही. काँग्रेसचे नेते असलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणात औरंगाबाद मनपा काँग्रेस नेत्यांना कसे डावलू शकते? मनपा आयुक्त पांडेय हे औरंगाबादचे आयुक्त आहेत कि शिवसेनेचे? असा सवाल काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केला आहे.
शहागंज मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण फेब्रुवारी २०२१ मध्ये पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार होते. परंतु ऐनवेळी हे अनावरण पुढे ढकलण्यात आले. मनपा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शहागंजमध्ये आणून त्यांच्या हस्ते अनावरण करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू होते. आता सोमवारी अखेर पालकमंत्र्यांच्याच हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. याबाबत औरंगाबाद काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, १९६० मध्ये काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृती पुतळा सर्वप्रथम बसवला होता. पूर्णाकृती पुतळ्यासाठी मनपाने १०-१२ वर्षे घेतली. आता अनावरणही शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना निमंत्रण द्यायला हवे होते. आपले मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे शिवसेनेचे आयुक्त आहेत कि औरंगाबादचे हा प्रश्न पडतो. आवड असेल तर त्यांनी खुशाल राजकारणात जावे. याबाबत पांडेय यांना संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. मात्र यामुळे सोमवारच्या कार्यक्रमात आम्ही विघ्न आणणार नाही असेही ते म्हणाले.