हवं तर मुंबई उत्तर तुम्ही घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या; काँग्रेसचा ठाकरेंना नवा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha Election 2024) जागेवरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झालाय. जागावाटपामध्ये सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसने (Congress) ठाकरेंपुढे एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. हवं तर उत्तर मुंबईची जागा तुम्ही लढा, पण आमची सांगली आम्हाला द्या असं काँग्रेसने ठाकरेंना सांगितल्याचे बोललं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने मुंबई उत्तर (Mumbai North) आणि सांगली (Sangli) या दोन जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युला नुसार, उत्तर मुंबई काँग्रेसला, तर सांगली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या हितासाठी सांगलीची जागा काँग्रेसने लढवावी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवसेनेने मुंबई उत्तर लढवावी असा प्रस्ताव आहे. जेष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ठाकरेंशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे असेही सूत्रांनी सांगितले. काँग्रेसला अपेक्षा आहे कि आज गुरुवार पर्यंत यावर तोडगा निघेल.

खरं तर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास उद्धव ठाकरेंसाठी सांगलीची जागा जिंकणं सोप्प नाही. तर दुसरीकडे मुंबई उत्तरमध्ये काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. मुंबई उत्तरामध्ये काँग्रेसकडे उमेदवार नसला तरी उद्धव ठाकरेंकडे विनोद घोसाळकर यांच्या रूपाने सक्षम पर्याय आहे. त्यामुळे दोन्ही जागांची अदलाबदल करण्यात यावी अशी काँग्रेसची मागणी आहे. १९ एप्रिल ही सांगलीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद यावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा आहे.