कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरावरून वाद; 17 मार्चला निघणार भव्य मोर्चा

Shivaji University
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या कोल्हापुरातील (Kolhapur) शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) नामांतराचा मुद्दा राज्यात चर्चेचा भाग बनला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यापीठाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचवेळी, शिवप्रेमी आणि पुरोगामी कोल्हापूरकरांनी या नामांतराला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले आहेत.

शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली होती. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोल्हापुरात या विद्यापीठाची स्थापना झाली. गेल्या सहा दशकांपासून शिवाजी विद्यापीठ या नावानेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विद्यापीठाची ओळख आहे. मात्र, आता हिंदुत्ववादी संघटनांनी नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, या मागणीसाठी 17 मार्च रोजी कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपचे तेलंगणातील आमदार टी. राजा देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनी स्वतःच यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी संपूर्ण हिंदू समाज एकवटला आहे. कोल्हापुरातील सर्व हिंदू बांधवांसाठी मी स्वतः 17 मार्चला कोल्हापुरात येत आहे. शिवाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी लावण्यास विरोध करणारे कोण आहेत? आमच्या इतिहासावर आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.”

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बैठकीतही नामांतराच्या मुद्यावर जोरदार पडसाद उमटले. या बैठकीत काही सदस्यांनी प्रशासनासमोर “आमचे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ” अशा घोषणा देत आपली भूमिका मांडली. यावेळी सिनेट इतर सदस्यांनी स्तगन प्रस्ताव मांडला मात्र प्रशासनाने तो तात्काळ मान्य केला नाही. त्यामुळे संतप्त सदस्यांनी बैठकीत निषेधार्थ पत्रके फेकली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने स्तगन प्रस्ताव मान्य केला, मात्र नामांतराच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद अजूनही महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.