नवी दिल्ली । देश अनलॉक होण्याची सुरूवात झाली असली तरी अद्याप अनेक कंपन्या पगार कपात करतच आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या हवाई वाहतूक सेवेतील सर्वच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगार कपात केली होती. एअर एशिया इंडियाने मे आणि जून महिन्याच्या वेतनात सरासरी ४० टक्के कपात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा फटका आणखी काही काळ बसणार असल्याचे दिसत आहे.
एअर एशिया इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एप्रिल महिन्यात २० टक्के पगार कपात स्वत:हून घेतली होती. अन्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगारात ७ ते १७ टक्के इतकी कपात झाली होती. अर्थात ज्यांचा पगार ५० हजार अथवा त्या पेक्षा कमी आहे त्यांच्या पगारात कोणताही कपात केली नव्हती. टाटा आणि एसआयए यांच्या मालिकीच्या ही विमान सेवा पुढील आठवड्यात ६ वर्ष पूर्ण करणार आहे.
या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५०० इतकी आहे. ३० एअरबस ए ३२० आणि पायलटची संख्या ६०० इतकी आहे. पायलटने उड्डाण केले अथवा न केले तरी ७० तासाचे वेतन मिळते. आता हे प्रमाण २० तास इतके करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने फस्ट ऑफिसरचे वेतन १ लाख ४० हजाराहून कमी करून ते ४० हजार इतके केले आहे. तर वरिष्ठ पायलटचे वेतन ३.४५ लाखांवरून एक लाख इतके करण्यात आले आहे. एका पायलटच्या एकूण वेतनात ४० टक्के इतकी कपात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
यासंदर्भात कंपनीकडून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीच्या अंतर्गत विषयात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करणार नसल्याचे एअर एशिया इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. सध्या कंपनी कोणतेही नवे विमान खरेदी करणार नाही. पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत पाच मध्यम आणि एक ए ३२० खरेदी करण्याची एअर एशिया इंडियाची योजना होती. मात्र, ही योजना लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्राने काही मार्गांवर हवाई वाहतूक करण्यास परवानगी दिली असली तरी विमान कंपन्यांचे नुकसान भरून निघण्यासाठी मोठा काळ लागणार असल्याचे बोलले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”