नगरसेवक बाळू खंदारे अखेर पोलिसांना शरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा नगरपालिकेचा नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे सोमवारी पोलिसांना शरण आला. त्याला शहर पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुमारे दीड वर्षापूर्वी तालीम संघ येथे सनी भोसले याला पिस्टल दाखवून प्राणघातक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

बाळू खंदारे याच्यासह सुमारे 15 जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला, आर्म अॅक्ट अन्वये दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सनी भोसले हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. सनी भोसले हे सहकाऱ्यांसोबत तालीम संघावरून जाताना एका कारमधील काही युवकांनी बाळू खंदारे याच्या कार्यालयाकडे पाहून शिवीगाळ केली. यावरून बाळू याने सनीला फोन करून त्याचा जाब विचारत तालीम संघावर बोलावले. यातूनच बाळू खंदारे याच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवत सनी भोसले याच्या सहकान्यांना मारहाण केली. या हल्ला घटनेनंतर सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांची उचलबांगडी केली, तर अनेकजण पसार झाले. बाळू खंदारे याने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे गेली दीड वर्षे अटकपूर्व जामीनाचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मात्र उच्च न्यायालयानेही बाळू खंदारे याचा जामीन अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयात जाणे किंवा पोलिसांना शरण जाणे असे दोन पर्याय त्याच्यासमोर होते. अखेर सोमवारी सकाळी बाळू खंदारे सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानुसार पोनि भगवान निंबाळकर यांनी त्याला अटक करुन दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलिस व बचाव पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी बाळू खंदारे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.