भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यासह सात जण तडीपार; चार जिल्ह्यांतील टोळीविरूद्ध २४ गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। आष्टा येथील भाजपचे माजी पदाधिकारी प्रवीण माने यांच्यासह सात जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली. दत्तात्रय कोळेकर, अनिल गावडे, सचिन रास्कर, काशिनाथ ढोले, शोएब सनदी आणि उमेश रास्कर अशी टोळीतील अन्य गुन्हेगारांची नावे आहेत.
टोळीविरोधात २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे ढाबे दणाणले आहेत. प्रवीण माने हा भाजप युवा मोर्चाचा माजी जिल्हा उपाध्यक्ष आहे. तो या टोळीचा म्होरक्‍या आहे. तो आष्टा आणि जवळच्या खेडगावात मटका-जुगाराचा व्यवसायही चालवतो. स्वतः मटका बुकी मालक असून त्याच्याकडे इतर लोक एजंट म्हणून काम करतात. यासह त्याने टोळी तयार केली होती.
सन 2011 पासून त्याची टोळी आष्टा व इस्लामपूर परिसरात कार्यरत होती. बेकायदेशीर जमाव जमवून दमदाटी व मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध मटका-जुगार व्यवसाय असा २४ गंभीर गुन्हे टोळीविरोधात दाखल आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपाराचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला. टोळीतील गुन्हेगारांना सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 नुसार ही कारवाई करण्यात आली.

Leave a Comment