सांगलीतील निरीक्षण गृहातून चार अल्पवयीन मुलींचे पलायन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

सांगली-मिरज रस्त्यावर कर्मवीर चौकाजवळ असलेल्या सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींच्या  बालगृहातून चार मुलींनी पलायन केले. १६ ते १८ या वयोगटातील या मुली आहेत. आज सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पलायन केलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

सांगली-मिरज रस्त्यावर हे बालगृह आहे. या ठिकाणी विविध गुन्ह्यात मिळून आलेल्या अल्पवयीन मुलींची रवानगी करण्यात येते. सध्या दहा मुली या ठिकाणी होत्या. सोमवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास बालगृहाच्या बाथरुमच्या दरवाजाची कडी उचकटून यातील चार मुलींनी पलायन केले. पलायन केलेल्या मुली या सांगलीवाडी, मिरज, पलूस, निमणी येथील आहेत. बालगृहातून चार मुलींनी पलायन केल्याची घटना समजतात खळबळ उडाली. याची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

या मुलींचा बसस्टँड, रेल्वेस्टेशन, बगीचे याठिकाणी शोध घेतला ; मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पलायन केलेल्या चारही मुलींची रवानगी पोलिसांमार्फत करण्यात आली होती. त्यापैकी एक मुलगी ही यापूर्वीही येथून निघून गेली होती. सात दिवसांनी तिचे १८ वर्षे वय पूर्ण होणार होते. मात्र, त्याआधीच ती पळून गेली आहे. पळून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक स्वाती पाटील यांनी दिली.

Leave a Comment