महत्त्वाची बातमी!! आता शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

0
1
farm roads
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शिव पाणंद आणि शेत रस्त्यांसाठी राज्य सरकारने एक ठोस पाऊल उचललेले आहे. राज्यातील सर्व शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून दर्जेदार कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले आहेत. तसेच, शेतरस्ते बंद करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देखील प्रशासनाला देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शिव पाणंद व शेतरस्त्यांविषयी नागरिकांच्या सूचना पब्लिक डोमेनद्वारे मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे आणि नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवली. यावेळी, ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्याचबरोबर, नागपूर जिल्ह्यात अवघ्या आठ ते दहा लाख रुपयांच्या खर्चात उत्कृष्ट पाणंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. कार्यपद्धतीचा अनुभव राज्यातील इतर जिल्ह्यांनी अभ्यासावा आणि त्यानुसार योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना बावनकुळे यांनी बैठकीत दिल्या. यासह पाणंद रस्त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि प्रलंबित प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत, असे आदेशही देण्यात आले.

दरम्यान, शेतरस्त्यांची मोजणी तसेच पोलीस संरक्षणासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे. तसेच, या रस्त्यांच्या क्रमांकाची नोंदणी केली जावी आणि त्यात फेरफार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश बावनकुळे यांच्याकडून देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे अनेक शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.