कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि प्रसिध्दी मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांचेवर सहकार परिषदेचे नेमलेले माजी अध्यक्ष चरेगांवकर यांनी केलेली टिका ही राजकीय वैफल्यातून आली असून त्यात अभ्यासाचा अभाव आहे. पृथ्वीराज बाबांना कराडच्या जनतेने निवडून दिले आहे. पृथ्वीराज बाबांचे आई, वडील यांच्यावरसुद्धा कराडच्या जनतेने प्रेम केले आहे कारण चव्हाण कुटुंबीयांची जनतेशी नाळ असल्यामुळेच.
लॉकडाउन सुरु झालेपासून चरेगावकर घरातून बाहेर सुद्धा पडले नसतील त्यावेळी पृथ्वीराज बाबांनी पहिल्या दिवसापासून गावागावात जाऊन जनतेमध्ये कोरोना बद्दल जनजागृती केली आहे तसेच गरजूंना मोफत धान्य वाटप सुद्धा केले आहे. लॉकडाऊन च्या अंमलबजावणी करिता व त्यामधून जनतेला किमान दिलासा मिळावा यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी दुकानें सुरु करण्याबाबत अश्या अनेक प्रश्नांवर पृथ्वीराज बाबांनी प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच कराडच्या व राज्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
नुकतेच पृथ्वीराज बाबांनी कराड साठी 60 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून कराड व मलकापूर नगरपालिकेसाठी 2 अँब्युलन्स व कराडचे स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व इतर कोरोना रुग्णालयासाठी 10 व्हेंटिलेटर ची व्यवस्था केली आहे. पृथ्वीराज बाबांनी केलेल्या या कामाची चरेगावकरांनी माहिती घ्यावी व मग आपले तोंड उघडावे.
याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये भाजपाचे सरकार सत्तेत असताना त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती न केल्याने आज राज्यात बेड ची संख्या वाढवताना अडचणी निर्माण होत आहेत. भाजप सरकारने रिक्त पदांची वेळेत भरती केली असती तर आज इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. पण सद्याचा काळ हा राजकीय उणीधुणी काढण्याचा नसून सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचा आहे, परंतु सत्त्तापिपासूं व ज्यांना काडीचा जनाधार नाही अश्या नेत्यांनी लोकनियुक्त नेत्यांवर टीका करणे हास्यास्पद आहे.
त्याचबरोबर बाबांनी त्यांच्याच प्रयत्नातून उभारलेल्या कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र येथे तात्काळ कोविड सेंटरची उभारणी करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसेच या कोविड सेंटरच्या उभारणीकरिता गरजेनुसार वैद्यकीय सामग्रीच्या खरेदीसाठी त्यांच्या स्थानिक आमदार निधीचा वापर करावा अशी शिफारसही बाबांनी केलेली आहे. हे वास्तव असताना भाजपने नेमलेल्या प्रवक्त्याने जी निरर्थक तथ्यहीन टिका केलेली आहे ते पाहता त्यांना पक्षाने चमकोगिरीचा आदेश दिला असणार, चरेगांवकरांना कदाचित माहीत नसावे पण कराड उपजिल्हा रुग्णालय सुरुवातीला मिक्स कोविड स्वरुपात सुरु होते. तिथे संसर्ग वाढल्यावर भाजपच्याच समर्थक आजी माजी नगरसेवकांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर नको म्हणून शासन दरबारी पिंगा घातला होता. त्यामुळे चरेगांवकरांनी तथ्यहीन टिका न करता, विधायक टिका करावी.
देशातील बाधितांची संख्या 40 लाखांच्या घरात पोहोचली आहे याला जबाबदार कोण? तसेच थकज ने लॉकडाऊन ची नियमावली जाहीर करून सुद्धा देशात लॉकडाऊन वेळीच का लावला गेला नाही? वेळीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाश्यांची कोरोना चाचणी करून त्यांना लगेच क्वारंटाईन का केले नाही? आणि या चुकांमुळेच देशात कोरोनाचा प्रसार वाढला, तेसुद्धा बोलण्याची हिम्मत चरेगावकरांनी दाखवावी. व जनतेला भ्रमित करण्याचा आपला उद्योग बंद करावा.