हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोना रुग्णांची घटती संख्या पाहून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची क्षमता या वरून हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच स्तरांमध्ये हे निर्बंध हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नव्या आदेशात वर्गीकरण केलं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला आमंत्रण देणारी गर्दी समारंभ सोहळे चालणार नाहीत, आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा
राज्यामध्ये कोणत्याही लेवलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, दैनंदिन व्यवहार किती उघडायचे किती काळ सुरू ठेवायचे त्याच्या वेळा या सर्व गोष्टी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवाव्यात. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन काळजी घ्या आणि सावध राहा. ‘रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा’ आहे असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, त्याला रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा म्हणून आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल. मुख्यमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की आपल्यासमोरआपल्यासमोर कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे. हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.