हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ओला ही इलेक्ट्रिक (Ola Electric) स्कुटर निर्माता कंपनी सर्वानाच माहित आहे. भारतीय बाजारात ओलाच्या स्कुटरची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र अनेकदा स्कुटरमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याच्या तर कधी कधी भर रस्त्यात ओला स्कुटरला आग लागल्याच्या घटना आपण बघितल्या आहेत. अजूनही या समस्या कायम असून ग्राहकांमध्ये नाराजी आहे. मात्र आज तर एका ग्राहकाने हद्दच केली. ओला इलेक्ट्रिक स्कूटर दुरुस्त करण्यास उशीर लागल्याने संतापलेल्या ग्राहकाने चक्क शोरूमच पेटवून दिले. कर्नाटकातील कलबुर्गी येथे हि धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ वर्षीय मोहम्मद नदीम असं आग लावलेल्या ग्राहकाचे नाव असून तो व्यवसायाने मेकॅनिक आहे. त्याने २८ ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. 1.4 लाख रुपये खर्च करून त्याने नवी कोरी स्कुटर विकत घेतली होती. मात्र स्कुटर खरेदी केल्यापासून त्याला वेगवेगळ्या समस्या उद्भदु लागल्या. स्कूटरच्या बॅटरी आणि साऊंड सिस्टममध्ये काही टेक्निकल अडचणी होत्या. मोहम्मद नदीमने याबाबत कंपनीकडे तक्रार करून आणि शोरूमला सातत्याने भेट देऊनही ओला इलेक्ट्रिकचे कर्मचाऱ्यांना त्याची अडचण दूर करता आली नाही. त्यामुळे त्याच्या मनात संताप निर्माण झाला.
याचाच राग मनात घेऊन मोहम्मद नदीमने पेट्रोलच्या मदतीने ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमला आग लावली. सुदैवाने ज्यावेळी आग लावण्यात आली त्यावेळी त्यावेळी शोरूम बंद होते त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत सहा स्कूटर जळाल्याने कंपनीचे एकूण साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मात्र ओलाचे नेमकं चाललंय काय? स्कुटर मध्ये सतत प्रॉब्लेम का येत आहेत? हा प्रश्न अजूनही कायम आहे.