हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात एकीकडं कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे संकट घोंगावत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. हे वादळ रायगड जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे . अनेक घरांची पडझड झाली असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एका महिलेचा बळी
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात आज पहाटे तीन वाजल्यापासून वादळाचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळली आहे या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय तर एका भाजीविक्रेती महिला देखील यामध्ये जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर 181 घरांना किरकोळ बाधा झाली आहे.
7, 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
दरम्यान वादळाची तीव्रता लक्षात घेता सात हजार 866 नागरिकांना सुस्थळी प्रशासनाने हलविले आहे. यात अलिबाग 605, 193 मुरुड, 1067 पनवेल, 168 उरण 451, कर्जत 45, खालापूर 176, माणगाव १३०६, रोहा 523 ,सुधागड 165 ,तळा 135, महाड 1080, पोलादपूर 295, श्रीवर्धन 1158 या ठिकाणातील एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित स्थळी आमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे
वीजपुरवठा खंडित
जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध मार्गावर बारा मोठी झाडे पडली होती जी आता मार्गावरून हलवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. श्रीवर्धन मुरूड तालूक्यातील वीजपुरवठा खंडित झाला तर रोहा महाड अलिबाग इथं काही ठिकाणी वीज प्रवाह खंडित करण्यात आला. महाड पोलादपूर येथे अनेक ठिकाणी पडलेले पोल उभे करून वीज प्रवाह सुरू करण्यात यश आले.