अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!! अनुराग ठाकूर यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात येत आहे. यंदा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. यापूर्वी अनेक कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यावेळी या पुरस्काराचा मान वहिदा रहमान यांना देण्यात येत आहे.

गेल्या 5 दशकांपासून अभिनेत्री वहिदा रहमान यांनी सिनेसृष्टीत नावलौकिक कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळेच त्यांना दादासाहेब पुरस्कार देण्यात येत आहे. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत म्हणले आहे की, “वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो”

अभिनेत्री वहिदा रहमान यांनी प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकेकाळी वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी तर डोक्यावर घेतल होत. या दोघांनी सीआयडी पासून ते गाईड पर्यंत अशा सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यापूर्वी वहिदा रहमान या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या देखील मानकरी ठरले आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देखील प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, आता वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात येईल.