सांस्कृतिक नगरी | कृष्णात स्वाती
सण-उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा नवीन पायंडा पडत असताना, त्या सणांचा मूळ उद्देश सफल होतो का? कोणत्या गोष्टी प्राधान्याने आणि खरंच आनंद देऊ शकतात? गर्दीचा भाग बनून जाण्यापेक्षा गर्दीतलं वेगळेपण सणांच्या निमित्ताने कसं अनुभवता येईल – त्याविषयी स्वानुभवावरून थोडंस..
काल एका पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे चर्चा चालली होती…
एक: – कोल्हापूरात यावर्षी डॉल्बी वाजणार काय?
दोन: – होय. वाजणार म्हणजे वाजणारच…
तीन: – यावर्षी मिरजेत तरी विचारूच नका. यंदा लोकांकडे पैसा पण भरपूर आहे. निवडणूका जवळ आल्यात ना!
एक: – हे सरकार, कोर्ट उगाचच आमच्या सणांना विरोध करतंय… काही तासांचाच तर प्रश्न असतो.
मी: – काही तास म्हणजे किती? किमान १० – १२ ते अगदी २४ – २४?
एक: – होय. तेच तर म्हणतोय वर्षातून एक दिवस वाजवला डॉल्बी तर काय मोठा फरक पडणार आहे?
मी: – हे डॉल्बीमुळं महाद्वार रोडवरील (कोल्हापूर) एक गॅलरी कोसळून कायमचा अधू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना विचारायला पाहिजे.
चार: – एक मिरवणूकीत खरी कॉर्नर जवळ खून झाला तेव्हा मी तिथं जवळच होतो. डॉल्बीच्या गोंधळात हे कुणाच्या लक्षात पण आलं नव्हतं.
मी: – लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी, ‘तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या पत्राचीसुद्धा गरज नाही. केवळ तुम्ही तुमच्या आईचे किंवा बहिणीचे एनओसी सोबत आणा.’ असं म्हंटलंय…
दोन: – त्यांचाच तर डॉल्बीला विरोध असतो.
मी: – का? त्याही हिंदू विरोधी आहेत?
एक: – नाही हो, त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटते.
मी: – आणि शिफारस पत्र देणाऱ्या नेते मंडळी, नगरसेवक, आमदार, खासदारांना?
सर्व: ……..
मी: – आकाशवाणीच्या आज रात्री आठच्या बातमी पत्रात सांगितले, ‘दहीहंडी फोडताना मुंबईत ६० गोपाळ जखमी आणि १ ठार’
दोन: – तसा एखादा अपघात होणारच की!
मी: – मग या अपघातात जखमी झालेल्या, मरण पावलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना हा प्रथांचा आणि त्या पार पाडण्यासाठी जखमी किंवा “शहीद” झालेल्या आपल्या तरुण मुलांचा अभिमान वाटत असेल!
एक: – तसं कसं होईल?
चार: – अलिकडे सणांना हिडीस स्वरुप आलंय. आणि याला केवळ तरुण कारणीभूत नाहीत. आपल्या राजकारणासाठी त्यांचा वापर करणारे राजकारणी जास्त कारणीभूत आहेत.
मी: – आणि स्वतःला संस्कृतीरक्षक, धर्मरक्षक म्हणवून घेणारे?
एक: – तेही आहेतच. पण आश्चर्य म्हणजे सणांमध्ये होणार्या अपघातात या राजकारणी, संस्कृतीरक्षकांच्या घरातील कुणीच जखमी होत नाही आणि बळीही जात नाही. मरतात ती आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरातील मुलं.
दोन:- मिरज दंगलीच्या वेळी तर यांनी वातावरण कसले तापवले होते! आमच्या शेजारच्या मंडळाची स्वागताची कमान स्वखर्चाने आणि सहभागी होऊन उभारणा-या मुसलमान चाचांनाही मारहाण झाली होती. त्यात त्यांचा हात मोडला.
चार:- तेव्हा इचलकरंजीतपण थोडा राडा झाला नव्हता!
तीन: – त्याचा फायदा पुढच्या निवडणूकीत झाला होता.
दोन: – यावर्षीच्या गणपती उत्सवात एकतरी दंगल होणारच. मी सांगतो लिहून घ्या! निवडणूका जवळ आल्यात ना!
एक: – टिळकांनी इंग्रजांविरुद्ध लोक एकत्र यावेत म्हणून सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केले आणि आज लोक एकत्र येऊन काय करत आहेत!
मी: – मला खरं सांगा, ‘आज सार्वजनिक स्वरुपात केल्या जाणाऱ्या एकातरी धर्माच्या एकातरी उत्सवात खरी भक्ती, धर्म भावना, सामाजिक ऐक्याचा विचार राहिला आहे का?
एक: – खरंतर अपवादात्मक काही मंडळं सोडली तर अजिबात नाही.
तीन: – सण साजरे करणे म्हणजे ताकद दाखवणे, श्रीमंती दाखवणे, अनेकवेळा दहशत माजवणे असं होऊन गेलंय.
पाच: – तुम्हाला सांगतो आमच्या घरातली पोरं गणपती आणि गरब्याच्या काळात नुसती जेवायलाच काय ती घरी येत्यात! घरातल्या कामाचं तर नाव काढंत नाहीत. काही सांगायला गेलो तर, ‘देवाचंच काम करायला जातोय न्हवं!’ म्हणत अंगावर येतात. ‘देवानं आसं कुठं करायला सांगितलंय?’ म्हंटलं तर ‘तुमी लय शानं हाईसा आता गप बसा म्हणत भाईर पडत्यात!
दोन:- आमच्या मंडळात दुसऱ्या मंडळांची जिरवायची तयारी आम्ही महिनाभर आधीपासून करत असतो.
एक: – यंदा वातावरण जरा जास्तीच तापणार आहे. परवा काहीजण, तुम्ही म्हणता तसे धर्मरक्षक, आमच्या मंडळात आले होते. यावर्षीचा गणपती उत्सव जोरदार झाला पाहिजे. आपल्याचे सण आपण नाही मोठ्याने साजरे करणार तर कोण करणार? त्या धर्मातले लोक बघा कसे कट्टर आहेत! त्यांना त्यांची जागा दाखवायची असेल तर नेभळटपणे सण साजरे करून चालणार नाहीत. आपली ताकद दाखवलीच पाहिजे. असे सर्वांचे प्रबोधन करून गेलेत.
मी: – सण साजरे करायचे म्हणजे नेमकं काय करायचं याची अधिक गांभीर्याने चर्चा करायची गरज आहे. धर्म म्हणजे नीती आणि धार्मिक असणं म्हणजे नैतिक असणं असं मानलं जातं. हा धर्म आणि ही धार्मिकता खरंच आज दिसते काय याचा विचार केला पाहिजे. तरुणाईशी संवाद केला पाहिजे. आपण विचार करणारी माणसं या संवादाला कमी पडतोय की काय असा प्रश्न पडतोय!
…कृष्णात स्वाती 8600230660