Dahod locomotive manufacturing plant : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद येथे भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं भव्य उद्घाटन केलं. यावेळी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत तयार झालेल्या पहिल्या ९००० अश्वशक्ती क्षमतेच्या इलेक्ट्रिक इंजिनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या आधुनिक प्रकल्पामुळे भारतात मालवाहतूक क्षमतेत मोठी वाढ होणार असून, देशांतर्गत वापरासोबतच निर्यातीसाठीही इंजिनांची निर्मिती केली जाणार आहे.
३ वर्षांत उभारलेला भव्य प्रकल्प
२०२२ मध्ये या प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा झाला होता आणि केवळ ३ वर्षांत दाहोद येथील हा लोकोमोटिव्ह प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे. वेस्टर्न रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “या वर्कशॉपची वार्षिक उत्पादन क्षमता १२० इंजिनांची असून, मागणीनुसार ती १५० पर्यंत वाढवता येईल.” (Dahod locomotive manufacturing plant)
२१,४०५ कोटींचा भव्य प्रकल्प
रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने साकार झालेल्या या प्रकल्पावर तब्बल ₹२१,४०५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी ९००० HP चे पहिले इंजिन देशाला समर्पित करताना ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या यशाचा गौरव केला. हे इंजिन ४६०० टन मालवाहू क्षमतेसह देशातील मालवाहतूक प्रणालीला जबरदस्त बळकटी देणार आहे.
Whatsapp चा धमाका!! टायपिंग शिवाय करा Live चॅटिंग, नवं फीचर्स लाँच
रेल्वे विकास प्रकल्पांना गती
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी एकूण ₹२३,६९२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले. यात आनंद-गोधरा, मेहसाणा-पाळनपूर आणि राजकोट-हडमतीया मार्गांचे दुहेरीकरण, सबरमती-बोटाद मार्गाचे १०७ कि.मी. इलेक्ट्रिफिकेशन आणि कलोल-कडी-काटोसन मार्गाचे गेज परिवर्तन यांचा समावेश आहे.
१०,००० लोकांना रोजगार
दाहोदचा लोकोमोटिव्ह प्रकल्प येत्या दशकात सुमारे १२०० इंजिनांची निर्मिती करणार आहे. यामुळे सुमारे १०,००० स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध होणार असून, संपूर्ण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.




