जावळी तालुक्यात रानगव्यांचा धुडगूस : भातपिकाचे नुकसान मात्र वनविभाग शांतच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावळी तालुक्यातील मौजे खांबील परिसरातील 25 एकराहून अधिक भात शेती रानगव्याने पूर्णतः नष्ट केल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच या परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना आता रानगव्याने नुकसान केले आहे. शेतीचे नुकसान होत असताना वनविभागाने मात्र याकडे कानाडोळा केला असल्याची तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. याबाबत वनविभागाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मौजे खांबील पोकळे येथील गंगाराम पांडुरंग जाधव, तानाबाई महादेव जाधव, लक्ष्मण धोंडीबा जाधव, मारुती हरिभाऊ शिंदे, संपत किसन शिंदे, सर्जेराव नामदेव कदम, राजाराम आत्माराम कदम, विशाल विठ्ठल जाधव या शेतकऱ्यांचे भात शेतीचे रानगवे दररोज येऊन नुकसान करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

गतवर्षी झालेल्या 23 आणि 24 जुलैच्या अतिवृष्टी मध्ये देखील या परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात भात पीक सापडलेच नाही. यावर्षी भात शेतीसाठी चांगला पाऊस झाला. मात्र, भातशेतीचे पीक हातातोंडाला आले असताना रानगव्याने पिकावर हल्ला चढवला आहे. गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. तरी प्रशासनाकडून अद्यापही गत वेळीची मदत मिळाली नाही. यातच पुन्हा रानगव्याने भात शेती फस्त केल्याने आता नेमकं प्रशासन किती रुपयाची भरपाई देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे का नाही? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.