ठाकरे- शिंदेंसाठी यंदाचा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील बंडाळी नंतर आज प्रथमच दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच २ दसरा मेळावा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानात होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारीही सुरु आहे. आपले राजकीय वजन सिद्ध करण्यासाठी आणि शिवसैनिक आपल्याकडे आहेत हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केला जात आहे. शिंदे आणि ठाकरेंसाठी आजचा दसरा मेळावा म्हणजे प्रतिष्ठेची लढाईच म्हणायला हवी.

शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आमचीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. याशिवाय शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे खेचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे काही पुरावे द्यावे लागतात. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त गर्दी खेचून आपलीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शिंदे गट आणि ठाकरेंकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा दोघांसाठीही अत्यंत प्रतिष्ठेचा आहे.

खरं तर शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठीदोन्ही गट उत्सुक होते मात्र मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाने बीकेसी मैदानाची जागा निवडली. बीकेसी मैदान हे शिवाजी पार्क पेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठं आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार-

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका करत आपले इरादे स्पष्ट केले होते. शिवसेनेतील बंडाळी नंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा रोख हा प्रामुख्याने बंडखोर आमदार आणि भाजपवर असणार आहे. आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसैनिकांना ऊर्जा देतील. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहेच. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीने पाठींबा दर्शवला आहे. परंतु सध्याच्या एकूण राजकीय परिस्थिती नंतर उद्धव ठाकरे फक्त शिवसेनेच्या आगामी वाटचालीबाबत बोलतात की महाविकास आघाडी म्हणून बोलतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार?

एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यानेच शिवसेना आमदार नाराज होते असं म्हंटल जात. बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरेंकडे नसून एकनाथ शिंदेंकडे आहेत असं शिंदे गटाकडून सातत्याने सांगितलं जात. त्यामुळे एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय बोलतात किंवा कोणता गौप्यस्फोट करतात हा हे सुद्धा पाहावं लागेल.