धक्कादायक!! शालेय पोषण आहाराच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. येथील एका महानगर पालिकेच्या एका शाळेत शालेय पोषण आहारात मेलेला उंदराचे अवशेष आढळले आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तब्बल 10 विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सध्या मुलांच्यावर तातडीने उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोला शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक 26 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष आपडले. हीच खिचडी या विद्यार्थ्यांनी खाल्ली होती, आणि त्यानंतरच अचानकपणे त्या सर्व विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. आणि त्यांच्यावर विषबाधा झाली. 10 विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागल्याने तातडीने त्यांना अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. परंतु या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे हलगर्जीपणा असून विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ केल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभागावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे.