आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता योग्य पद्धतीने वाटप व्हावी, वारसांमध्ये वाद निर्माण होऊ नये आणि आपली शेवटची इच्छा कायदेशीर स्वरूपात पूर्ण होण्यासाठी “मृत्युपत्र” (Will) तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, अनेकांना मृत्युपत्र काय असते, ते कसे करावे आणि कायद्यानुसार कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची पुरेशी माहिती नसते. परिणामी अनेक वेळा वारसांमध्ये वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक सकारात्मक आणि मानवीय दृष्टिकोनातून अभिनव पाऊल उचलले आहे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन मृत्युपत्रविषयी मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांची नोंदणी करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुण्यात या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली असून, हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग ठरला आहे.
ज्येष्ठांसाठी ‘रिस्पेक्ट’ उपक्रमातून कायदेशीर मार्गदर्शन
शासनाच्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा सहनिबंधक कार्यालयाने ‘साईराम’ या विशेष उपक्रमांतर्गत ‘रिस्पेक्ट’ नावाचे अभियान हाती घेतले. यामध्ये मोहम्मदवाडी येथील सोनाश्रय वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना मृत्युपत्र विषयक मार्गदर्शन करण्यात आले. या पुढाकाराचा पुढील टप्पा म्हणजे गरजूंना थेट त्यांच्या घरी जाऊन सेवा देणे, जेणेकरून आरोग्याच्या किंवा वयोमानाच्या कारणास्तव कार्यालयात येऊ न शकणाऱ्या व्यक्तींसाठीही ही सुविधा सहज उपलब्ध होईल.
कशी करावी नोंदणी?
ज्येष्ठ नागरिकांना आता मृत्युपत्र नोंदणीसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले की, अशा नागरिकांसाठी गृहभेट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी संबंधितांनी जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात वकील किंवा प्रतिनिधीमार्फत अर्ज करावा. अर्जाचा नमुना igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गृहभेटीसाठी फक्त ₹300 शुल्क आकारले जाते. नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी संपूर्ण भेटीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याची सीडी दुय्यम निबंधक कार्यालयात जमा करावी लागते. याशिवाय, मृत्युपत्र तयार करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.
काय, का, केव्हा आणि कसे?
मृत्युपत्र म्हणजे आपल्या मृत्युपश्चात आपल्या मालमत्तेच्या वाटपाची इच्छित नियोजनपूर्वक लेखी मांडणी. ही मालमत्ता स्थावर (जमीन, घर) किंवा जंगम (नगदी, दागिने, शेअर्स) असू शकते. मृत्युपत्र कोणतीही १८ वर्षांवरील मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती करू शकते. ते कोऱ्या कागदावर लिहिलेले असूनही वैध असते, मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी बंधनकारक नाही पण नोंदणी केल्यास न्यायालयीन कामकाजात ते अधिक प्रमाणिक ठरते.
मृत्युपत्र करताना दोन साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक असून, हे साक्षीदार लाभार्थी नसावेत आणि कायद्याने सज्ञान असावेत. मृत्युपत्र नोंदणीसाठी ₹100 इतके नाममात्र शुल्क आहे.
महत्त्व का?
मृत्युपत्रामुळे मृत्युपश्चात होणारे वारसांमधील वाद टाळता येतात. ते वैध स्वरूपात तयार करून, नोंदणी केल्यास वारसांना नंतर मालमत्तेच्या हक्कासाठी वेठीस धरण्याचा धोका टाळता येतो. तसेच मृत्युपत्र नोंदणीकृत असल्याने ते न्यायालयात अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते