Sunday, April 2, 2023

कासवंड वनक्षेत्रात प्रसूती दरम्यान गव्याचा मृत्यू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड येथील वनक्षेत्रात एका मादी गव्याचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित गव्याची तपासणी केल्यानंतर प्रसूती दरम्यान मादी गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात शुक्रवारी अभिषेक पवार हे पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेले होते. भटकंती करत असताना त्यांना वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आला. यावेळी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो गवा असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्यांनी घरी जाऊन याबाबतची माहिती वडील वन्यजीवप्रेमी सर्जेराव पवार यांना दिली.

- Advertisement -

मिळालेलया माहितीनंतर सर्जेराव पवार यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन्यजीवप्रेमी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत अवस्थेत आढळलेल्या गव्याची पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. तर वनअधिकारी व पशूवैद्यकीय अधिकारी जितेंद्र पाठक यांनी मादी जातीच्या गव्याची तपासणी केली.

वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित गवा मादी पैलारू असून प्रसूती पश्च्यात गर्भाशय फाटल्याने मरण पावल्याची शक्यता पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली. पंचनामा केल्यानंतर त्याच ठिकाणी गव्याचे दहन करण्यात आले.