व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणातील आरोपी आरिज खानच्या फाशीची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आरिज खानच्या फाशीची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या शिक्षेचे रूपांतर उच्च न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेत केले आहे. यापूर्वी बाटला हाऊस एन्काउंटर याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मार्च 2021 मध्ये आरिज  खानला फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरिज खानने दिल्ली उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणी अंतीच गुरूवारी उच्च न्यायालयाने आरिज खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

2008 मध्ये मुठभेड़मध्ये दिल्ली पोलीस इंस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी 2021 मध्ये दिल्लीच्या साकेत न्यायालयाने बाटला हाऊसमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शर्माच्या हत्येसाठी आरिज खानला दोषी ठरवले होते. त्यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आरिजला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला आरिज खानकडून उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत गुरूवारी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती अमित शर्मा यांच्या खंडपीठाने अरिज खानची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरण

दरम्यान, 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्ली येथे साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर 133 जण जखमी झाले होते. या घटनेच्या तपासात दिल्ली पोलिसांच्या हाती माहिती लागली होती की, हा बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने घडवून आणला आहे. पुढे, या प्रकरणाचा तपास सुरू असताना दिल्ली पोलिसांना बाटला हाऊसमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती.

या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी दिल्लीचे पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी पथकावर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांकडून मोहन चंद शर्मा यांना देखील गोळ्या झाडण्यात आल्या. या चकमकीत शर्मा यांच्यासह दोन दहशतवादी ही ठार झाले होते. परंतु त्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या अरिज खान आणि शहजाद अहमद यांना अटक केली होती. मात्र काही काळानंतर शहजाद अहमद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अरिज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.