तुझे तुकडे तुकडे करून….; अयोध्या पौळ यांना संतोष बांगर समर्थकांकडून धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका टिपणी होताना दिसते. मात्र यावेळी आता अयोध्या यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष बांगर यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे. उद्या जर माझ्या जीवाचे बरे वाईट काही झाले तर त्यास संतोष बांगर जबाबदार असतील असे ही पौळ यांनी म्हटले आहे.

याबाबत बुधवारी अयोध्या पौळ यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये, “गद्दार संतोष बांगर यांचा समर्थक तथा नगरसेवक राम कदम याने फोन करुन अश्लिल भाषा व “तुझे तुकडे तुकडे करुन कुठं फेकून दिले तर कोणाला पत्ता लागणार नाही” असे शब्द वापरुन मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे” असे म्हणले आहे. त्याचबरोबर, “माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार गद्दार संतोष बांगर व त्याला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील” असा इशारा देखील दिला आहे.

सध्या अयोध्या पौळ पाटील यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक ट्विट करत त्यांना आलेल्या कॉलच्या रेकॉर्डिंगची क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये कॉलवरील व्यक्ती त्यांची लायकी काढताना दिसत आहे. समोरील व्यक्ती खालच्या थराला बोलत असल्यामुळे पौळ त्यांना प्रत्त्युत्तर देताना दिसत आहेत. या व्यक्तीने त्यांच्याशी बोलताना अश्लील शब्द वापरल्याचा आरोप ही पौळ यांनी केला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, “याआधी एक तासांपासून वेगवेगळ्या नंबर वरुन अत्यंत अश्लील भाषा वापरुन मला जिवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांचे. माझ्या जीवाला संतोष बांगर व त्याला पाठीशी घालणाऱ्या एकनाथ शिंदेकडून धोका आहे” पौळ यांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अद्याप पौळ यांनी केलेल्या आरोपांवर संतोष बांगल यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान अयोध्या पौळ पाटील या सुरुवातीपासून बांगर यांच्या विरोधात आहेत. या दोघांमध्ये सगळ्यात कोणत्या ना कारणावरून टीकाटिपणी होत असते. यापूर्वी अयोध्या पौळ पाटील या शाईफेक आणि मारहाणीच्या प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. तसेच पौळ यांना सोशल मीडियावर देण्यात आलेल्या धमक्यांचे प्रकार याआधीही समोर आले होते.