हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. “मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील” असा इशारा धमकीदाराने छगन भुजबळ यांना दिला आहे. या घटनेनंतर छगन भुजबळ यांच्या बाजूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात धमकीसंबंधीची तक्रार नोंदवली आहे. मात्र अद्यापही धमकी कोणाकडून देण्यात आली आहे, हे अजून उघडकीस आलेले नाही.
शुक्रवारी छगन भुजबळ येवल्याच्या दौऱ्यावर निघाले असताना त्यांच्या सहाय्यकांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला होता. पलीकडील व्यक्ती छगन भुजबळ साहेबांशी बोलायचे आहे असे सांगत होती. मात्र त्या व्यक्तीला छगन भुजबळांशी संपर्क साधता आला नाही. अखेर या अज्ञात व्यक्तीने छगन भुजबळ यांच्या व्हॉटसॲपवर मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये “तुम्ही निट रहा नाहीतर तुम्हाला बघुन घेऊ, तू जास्त दिवस राहणार नाही.” अशी धमकी छगन भुजबळ यांना देण्यात आली होती. यानंतर ताबडतोब अंबादास खैरे यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.
या तक्रारीच्या आधारावर अंबड पोलिसांनी मेसेज आलेला नंबर ट्रेस केला असून ती धमकी परभणी भागातील आली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, अंबड पोलिस संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मिळालेल्या लोकेशनवर रवाना झाले आहेत. दरम्यान, गेल्या पाच वर्षात छगन भुजबळ यांना देण्यात आलेली ही पाचवी धमकी आहे. यापूर्वी देखील भुजबळ यांना पत्राच्या माध्यमातून, फोनद्वारे, मेसेज द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा छगन भुजबळ यांना अशीच एक धमकी मिळाली आहे.