औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच काढणीला आलेले पीक मातीमोल झालं आहे. हातातोंडाचा घास गेल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अस आवाहन केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात शेतकरी बांधवांचे खरिप हंगामाचे उभे पिक बाहुन गेल्याने आणि शेतात गुडघ्या पर्यंत पाणी साचुन जमीनीवर मोठमोठे खड्डे पडल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. पुन्हा त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नसल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले अस जलील म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असुन कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असुन कधी न भरून निघणारे आर्थिक नुकसान झालेले आहे. पावसान जमिनीत मोठ्या प्रमाणात तण उगवल्यामुळे रब्बीच्या पेरणीला विलंब होणार आहे. खरिपाचे उत्पन्न अद्याप हाती आलेले नाही. त्यामुळे तण काढणे, पेरणीसाठी बियाणे व खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.

जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकरत मिळण्यास मदत होईल.. आपणास नम्र विनंती की, शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत जाहीर करावी अशी विनंती इम्तियाज जलील यांनी केली.