मी प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर आला नाही; केसरकरांचा अजब तर्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. आता कुठे मुसळधार पाऊस पडलेल्या भागातील स्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अतिवृष्टी झालेल्या भागांचा आढावा घेण्यात येत आहे. याचवेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजब विधान केलं आहे. मी शिर्डीत असताना साईबाबांकडे प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर आला नसल्याचा अजब तर्क केसरकरांनी लावला.

दीपक केसरकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणले की, “राधानगरी धरणातून पाणी सोडल्यावर पाणी पातळी पाच फूट वाढते आणि पूरस्थिती निर्माण होते. पाणी सोडले तेव्हा मी योगायोगाने शिर्डीत होतो, मी साईबाबांकडे प्रार्थना केली आणि यंदा एक फुटानेही पाणी पातळी वाढली नाही. याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा, पण देवाकडे प्रार्थना केल्यामुळेच पूरस्थिती कमी झाली असा अजब असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. पावसाने विश्रांती घेतल्याने राधानगरी धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले. अजून काही दिवस पाऊस पडला असता तर अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असत़ी मात्र, निसर्गातही देव आहे हे जाणवले” असे केसरकर म्हणाले. आता त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय नेत्यांकडून केसरकर यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. दीपक केसरकर यांच्या आश्चर्यकारक दाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

केसरकर यांच्या वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “तुमच्या दाव्यामुळे कोल्हापुरात पूर येत नसेल तर तुम्ही आमच्या नाशिकला या. देवाचा धावा करा आणि धरणं पूर्ण भरून द्या. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागातील धरणांची पातळी देखील क्षमतेपेक्षा जास्त वाढली आहे. हवामान खात्याकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता अनेक भागात मुसळधार पावसाचा वेग कमी झाल्याचे दिसत आहे.