CBI कडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

दिल्लीतील कथित मद्य अबकारी धोरणातील गैरप्रकाराच्या आरोपांनी घेरलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. गृह मंत्रालयानं सीबीआयला फीडबॅक यूनिटच्या माध्यमातून हेरगिरी करण्याच्या आरोपांबाबत मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भ्रष्टाचार निर्मुलन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशीचे आदेश दिले होते.

सीबीआयनं गेल्या काही दिवसांत दिल्ली सरकारच्या फीडबॅक यूनिटवर हेरगिरी केल्याचे आरोप करत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागितली होती. दरम्यान, आज त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मनीष सिसोदिया यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना किती दिवस कोठडी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली सरकारनं २०१५ साली फीड बॅक यूनिटची स्थापना केली होती. यात तेव्हा २० अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. याच फिड बॅक यूनिटने फेब्रुवारी २०१६ पासून सप्टेंबर २०१६ या कालावधीत राजकीय विरोधकांची हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युनिटनं केवळ बीजेपीचेच नव्हे, तर ‘आप’शी निगडीत नेत्यांवरही पाळत ठेवली. इतकंच नव्हे, तर यासाटी युनिटनं राज्यपालांची देखील परवानगी घेतली नव्हती. यूनिटनं निश्चित कामांच्या पलिकडे जात राजकीय नेत्यांची गुप्त माहिती देखील जमा केली असा आरोप करण्यात आला आहे.