टीम, HELLO महाराष्ट्र। देशाच्या राजधानीमध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनी फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी यासाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी कोर्टाकडे विनंती केली होती. तर फाशी टाळावी यासाठी आरोपींकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे. या याचिकांची ढाल बनवत दोषी आरोपी फाशीच्या शिक्षेपासून दूर पळताना पाहायला मिळतं आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती.
मात्र आता निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकार केली आहे आणि त्या याचिकेवर १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायाधीशांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान निर्भयाच्या आईने न्यायालयाकडे आरोपींविरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी निर्भयाच्या वकीलांनी न्यायालयाकडे आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित करण्याची मागणी केली. यापूर्वी निर्भयाच्या आईनंदेखील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र आजची सुनावणी पुढे गेल्यामुळे १८ डिसेंबर कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.