हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने सुनावणी दरम्यान केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यास स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगितीच राहील असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांचा नियमित जामीन मंजूर केला होता. परंतु ईडीने या जामीनाला विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने ईडीच्या बाजूने निकाल दिला.
मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने 21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. या अटकेनंतर केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या कोठडीत सतत वाढ करण्यात आली. मधल्या काळात अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु पुन्हा त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण जावे लागले. यानंतर 21 जून रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र हा जामीन मंजूर होताच ईडीने त्याला विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे आज झालेल्या सुनावणीत ताबडतोब उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली. त्याचबरोबर, या प्रकरणाची सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जामीनाला स्थगिती राहील असे देखील सांगितले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळेच आता केजरीवाल यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे वकील काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.