मनीष सिसोदिया यांना 5 दिवसांची CBI कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री त्यांना दिल्लीतील दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाई अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आज दुपारी 3:15 वाजता सिसोदिया यांना राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 4 मार्च पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. सायंकाळी 5 वाजता विशेष न्यायाधीशांनी सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभरातील दिल्ली, हरियाणा, भोपाळ, चंदीगडसह देशाच्या विविध भागात आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली आहेत. आपचे खासदार संजय सिंग यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मनीष सिसोदिया यांना अटक करणे हा मोदी सरकारचा भ्याडपणा आहे. मोदीजींचा मित्र अदानी ज्याने लाखो कोटींचा घोटाळा केला पण त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही असं म्हणत मला ED- CBI द्या, २ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांना अटक करतो अशा शब्दात संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.