मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारने यंदाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसंदर्भात काहीही खुलासा केला नसल्याने, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने खुलासा करत या परीक्षा रद्द कराव्यात असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारच्या निर्णयास अनुसरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने त्यांच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करून मागील सत्राच्या सरासरीइतके गुणांकन देऊन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तांबे यांनी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायूनंदन यांच्याकडे शुक्रवारी केली. विद्यापीठाच्या एकूण १५२ विविध शिक्षणक्रमांसाठी सहा लाख २४ हजार २६० विद्यार्थी प्रविष्ट असून, त्यात ५ लाख ७० हजार व ५४ हजार २६० विद्यार्थी पुन: परीक्षार्थी आहेत.
हे विद्यार्थी ग्रामीण भागातील कष्टकरी समाजातील नोकरी व व्यवसाय सांभाळून शिक्षण घेणारे होतकरू युवक आहेत. अगोदरच करोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून पुढच्या वर्षात प्रवेश दिला, तर या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे तांबे यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in