हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्याच्या मुलाला लग्न करायचं आले तर त्याला ३ नंबरचा गाळ म्हणजे हेबडली हाबडली जी पोरगी आहे अशी मुलगी मिळते असं बेताल विधान देवेंद्र भूयार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून देवेंद्र भुयार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येतंय.
अमरावती येथील एका जाहीर सभेत बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलाला नोकरीवाला पाहिजे. मुलगी स्मार्ट आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटणार नाही. ती नोकरी करणाऱ्या मुलांना मिळते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे, पानटपरी, किराणाचे दुकान आहे अशा मुलांना मिळते. तीन नंबरचा जो राहिलेला गाळ आहे तो हेबडली हाबडली जी पोरगी आहे. ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते. देवेंद्र भुयार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शेतकऱ्याच्या पोराचं खरं राहिल नाही आहे. कारण जन्माला येणारे जे लेकरू आहे ते हेबंड वांभडच निघत राहिल. म्हणजे माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असा सगळा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही जरा सावध राहा असेही त्यांनी म्हंटल.
दरम्यान, देवेंद्र भुयार यांच्या या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून भुयार यांच्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भुयार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भुयार यांचे हे वक्तव्य कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल टवाळी करणारा प्रकार आहे.लोकांची अवहेलना करणे आहे. दादा गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांना एक खात्री पटली आहे की आपण काहीही केले तरीही आपल्यावर कारवाई होणार नाही, या मस्तवालपणापासून अशी वाक्य येतात. शेतकरी आणि महिलांची टींगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का?, असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी केला.