संशयित बोटीबाबत फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील रायगड येथील हरिहरेश्वर किनाऱ्यावर दोन संशयास्पद बोटी सापडल्या आहेत. या बोटीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात याबाबत अधिक माहिती दिली आहे. हि बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असून मस्कत हुन युरोपकडे जाताना भरकटत ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्यावर आली असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून त्या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. त्या महिलेचे पती सदर बोटीचे कप्तान असून ती बोट मस्कत हुन युरोपकडे जाणार होती. २६ जून २०२२ रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले. आणि खलाश्यानी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर कोरियन युद्धनौकेने बोटीतील खलाश्यांशी सुटका केली आणि त्यांना ओमानकडे सुपूर्द केलं. समुद्र खवळलेला असल्यामुळे भरकटत ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्यावर आली अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड विभागाकडून आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितल.

सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक करत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क सुरु असून बारकाईने पुढील तपस करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. हि माहिती प्राप्त झाली असली तरी कुठेही कमी राहू नये यादृष्टीने खबरदारी म्हणून सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली आहे आणि केंद्रीय यंत्रणाही आपल्या संपर्कात आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.