2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्यं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. भंडाऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, “2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील” असा दावा चंद्रशेखर बावळकुळे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मेळाव्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात एकच वाघ आहे देवेंद्र फडणवीस. दुसरा कुणी वाघ होऊ शकत नाही. त्यामुळे घोषणा देताना देवेंद्रजींच्याच द्यायच्या. महाराष्ट्राचा एकच वाघ ते म्हणजे देवेंद्र फडणवीस”

त्याचबरोबर, “जेव्हा-जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा येतो. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. 2024 ला कोण मुख्यमंत्री होणार, असा सवाल केल्यास आता इतकंच सांगतो की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकांना सामोरं जाणार आहोत” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, “आजच्या मेळाव्यात पहिला संकल्प करायचा की, नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणि त्यामध्ये भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येतील. तसेच, दुसरा संकल्प हा राहील की 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील” असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.