Sunday, May 28, 2023

टायगर अभी जिंदा है; मुंडेंच्या स्वागतासाठी परळीत 50 फुटी बॅनर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे मुंबईत उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच परळीत परतत आहेत. ते येत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याचा निर्णय समर्थकांनी घेतला आहे. उद्या रविवारी धनंजय मुंडे परळीत येत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळीत तब्बल 50 फुटी बॅनर लावला असून टायगर अभी जिंदा है…असे त्यावर लिहण्यात आले आहे. असे बॅनर्स येथे जास्त लक्ष वेधून घेत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा 4 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी परळीत भीषण अपघात झाला होता. या घटनेत त्यांच्या कारचा चक्काचूर झाला होता. तर मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. मुंबईतील बीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी तब्बल 35 दिवसानंतर ते परळीत परतत आहेत.

दरम्यान, मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी शहरात पन्नास फुटी बॅनर लावण्यात आले असून शहरातील प्रत्येक प्रवेश द्वाराला कमानीने सजवण्यात आले. मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत भव्य मिरवणूक निघणार आहेत. विशेष म्हणजे या रॅलीत केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतलं ढोल पथक मागवण्यात आले आहे. मुंडे उद्या दुपारी 12.30 वाजता बीड जिल्ह्यात येतील. अगोदर गहिनीनाथ गडावर जावून दर्शन घेतील. त्यानंतर ते मूळ गावी परळीत येतील. दुपारी 4 वाजता ते परळीत येऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतील. नंतर पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतील.