शरद पवारांचा धनंजय मुंडेंना चेकमेट; निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या पूर्वीच कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश मुंडे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. सध्या परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात बबन गित्ते यांना मैदानात उतरवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे.

शरद पवारांच्या या खेळीमुळे आगामी निवडणुकीवेळी परळी मतदारसंघांमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट आमने सामने भिडणार असल्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांनीच शरद पवार गटात सहभाग नोंदवल्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. बबन गीते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच त्यांची पत्नी परळी पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. तसेच, बबन गीते यांचे धनंजय मुंडे यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी देखील भाजपची हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज याच धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा बालेकिल्ला असणाऱ्या बीडमध्ये शरद पवार यांची सभा पार पडत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना चेकमेट देण्यासाठी शरद पवार ही सभा घेत असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, बीडमध्ये घेण्यात आलेल्या सभेबाबत शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत “अशी सभा घेण्याचा त्यांना (अजित पवार) अधिकार आहे. पण ज्या जिल्ह्यात ते सभा घेत आहेत. त्या जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत एका महिलेने केलेल्या आरोपाचा इतिहासही ते जमलेल्या लोकांना आवर्जून सांगतील” असे म्हणले आहे. त्यामुळे आता आज पार पडत असलेल्या बीड मधील सभेत शरद पवारांची कोणावर तोफ धडाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.