उमरगा ते परंडा…. विधानसभेला धाराशिव जिल्ह्यात राजकारण कुणाच्या बाजूने झुकेल?

Dharashiv Assembly Election 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधीचा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव (Dharashiv) .. तुळजापूरच्या आई भवानीच्या सहवासाने पावन झालेल्या या जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र काट्यानं काटा काढावा असं, आणि घराणेशाहीचा शिक्का मारलेलं राहीलं… राजकीय चेहरे बदलत गेले पण जिल्ह्याचे प्रश्न कायम राहीले… सुमसाम एमआयडीसी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे वाजलेले तीन तेरा, पाण्याचा प्रश्न आणि दिवसागणिक छातीत धडकी भरावा असा वाढणारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा.. हे सगळं धाराशीवच्या बकाल जिल्ह्याला आणखीनच पोकळ बनवतं… लोकसभेला शिवसेना ठाकरे गट तर विधानसभेला काँग्रेस – राष्ट्रवादीला कौल देणारा धाराशीवचा पॅटर्न जरा वेगळाच आहे.. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारतंय? उमरगा, परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर (4 विधानसभा एकत्रित मॅप ) या चार जागांवर यंदा आमदारकीला नेमकी कुणाची फिल्डींग गुलालापर्यंत घेऊन जातीय? शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभा निवडणुकीवर कसा इपॅक्ट पडताना दिसेल? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…

यातला पहीला मतदारसंघ येतो तो धाराशीव विधानसभेचा… पॉलिटीक्समधील बिग बी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ म्हणून धाराशीव विधानसभेची आगळीवेगळी ओळख.. १९७४ पासून ते २००९ पर्यंत सलग सात वेळा निवडून येण्याचा रेकाॅर्ड हा पद्मसिंह पाटलांच्या नावावर राहीला.. पण राष्ट्रवादीच्या आणि पद्मसिंह पाटलांच्या या बालेकिल्ल्याला पहिल्यांदा नख लागलं ते २००९ साली…पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना विधानसभेच्या पदार्पणातच पवनराजे निंबाळकरांनी ( Rana Jagjit Singh Vs Omraje ) मात देत शिवसेनेचा भगवा धाराशीववर फडकवला… पण पवनराजेंची खळबळजनक हत्या झाल्यानं आणि या हत्याकांडाचे धागेदोरे जगजितसिंह पाटलांपर्यंत येऊन पोहचल्याने पाटील आणि निंबाळकर घराण्यात राजकीय विस्तव पडला, त्याची आग आजही विझलेली दिसत नाही… राणा जगजितसिंह यांनी २००९ च्या पराभवाचे उट्टे २०१४ ला काढले… ओमराजे वर्सेस राणा जगजीतसिंह अशा झालेल्या या लढतीत राणा जगजीतसिंह यांनी आमदारकीचा गुलाल उधळला… शिवसेना आणि भाजपातील मतविभाजनाचा फटका त्यावेळस राणा जगजीतसिंह यांच्या पथ्यावर पडला… पण खरी टशन झाली ती लोकसभा निवडणुकीला…

२०१९ ला धाराशीव लोकसभेसाठी राणा जगजिसिंह आणि ओमराजे निंबाळकर हे दोन्ही दिग्गज आमने सामने आले.. पण लोकसभेला मात्र राणा जगजितसिंह यांचं पानिपत झालं आणि ओमराजे भल्या मोठ्या लीडने थाटात खासदार झाले… बदलेली राजकीय समीकरण पाहून विधानसभेआधीच पद्मसिंह पाटलांनी भाजपची वाट धरली.. युती असल्यामुळे धाराशीवची जागा शिवसेनेला सोडावी लागल्यामुळे राणा जगजीतसिंह तुळजापुरला गेले आणि धाराशीवची लढत झाली ती राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर तर शिवसेनेकडून कैलास पाटील यांच्यात इथे अटीतटीचा सामना झाला… आणि शिवसेनेच्या कैलास पाटलांनी मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला.. सध्या कैलास पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटात असल्यानं महाविकास आघाडीकडून यंदाही तेच उमेदवार असतील. खासदार ओमराजेंची साथ, मतदारसंघातला जनसंपर्क, कडव्या शिवसैनिकांची साथ पाहता यंदाही कैलास पाटीलच आमदारकीचा गुलाल उधळतील, असं इथलं वातावरण आहे. बाकी महायुतीकडून म्हणावा असा उमेदवार सध्या तरी रिंगणात दिसत नाहीये..

दुसरा मतदारसंघ येतो तो तुळजापूरचा.. तुळजाभवानीच्या मंदीरात पूजा करताना धोतर परिधान करावं लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो, अशी जणू अलिखीत परंपरा होती.. शिवाजीराव पाटील बाभूळगावकर, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण या धोतरवाल्या राजकारण्यांनी तुळजापूरची आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली… अगदी उतारवयातही धोतर घालून विधीमंडळ गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकररावांची ओळख होती… लोकल बोर्ड, जिल्हा बँक, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी याच आमदारकीच्या जीवावर कमावलं… आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ मंत्री देखील राहिले… पण एवढा सारा राजकीय वारसा लाभूनही मतदारसंघाचा म्हणावा असा विकास झाला नाही… त्यात तरुण आमदार देण्याची भाषा प्रत्येक निवडणुकीत करण्यात आली… पण त्याला विरोधकांना यश काही आलं नाही… पण 2018 पासूनच अशोक जगदाळे यांनी फिल्डींग लावत मधुकरराव चव्हाणांच्या विरोधात रान तापवलं… मतदारसंघातील महिलासाठी देवदर्शन सहल, फिरता दवाखाना, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा, जनावरासाठी चारा वाटप करत यंदा काहीही झालं तरी तुळजापूरची आमदारकी मिळवायचीच… असं जणू स्वतःशी चंग बांधला होता.. पण या सगळ्यात नवा ट्विस्ट आला तो म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच लोकसभेत पराभवाचा दणका बसलेल्या राणा जगजीतसिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत भाजपकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवली… प्रचाराला अवघे काही दिवसच मिळूनही जगदाळेंनी मधुकररावांच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणाचा फायदा राणा जगजीतसिंग यांना मिळाला… आणि प्रस्थापित मधुकरराव चव्हाणांचा पराभव करत तुळजापुरातून आमदारकी मिळवली…थोडक्यात 2019 ला धोतर नेसणारा आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात राणा जगजीतसिंग यांना यश आलंच…. मात्र यंदाच्या विधानसभेला तुळजापूरची राजकीय समीकरण पूरती बदलून गेली आहेत… महायुतीकडून इथून राणा जगजीतसिंग हेच मैदानात दिसतील… तर दुसऱ्या बाजूला ओमराजेंचा जनसंपर्क, काँग्रेसची साथ असं प्लसमधलं समीकरण असल्याने खूप विचारपूर्वक महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागणार आहे…दयानंद रोजकरी आणि शरद पवार गटात असणारे अशोक भाऊ जगदाळे हे राणांना कडवी आणि निर्णायक फाईट देऊ शकतात… थोडक्यात पत्नीच्या पाठोपाठ आता राणा रणजीतसिंग यांच्या आमदारकीवरही पराभवाची टांगती तलवार दिसतेय…असं म्हणायला हरकत नाही…

तिसरा मतदारसंघ येतो तो उमरगा विधानसभा… अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या उमरगा विधानसभेत ज्ञानराज चौगुले हे तब्बल तीन टर्मचे आमदार राहिले आहेत… माजी खासदार रवींद्र गायकवाड Ravindra Gaikwad With Dnyanraj Chougule यांचा मदतीचा हात मिळाल्यानं चौगुले विधानसभेवर निवडून आले… पुढे प्रामाणिक आणि कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती… पण शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात गेल्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंची मशाल इथून बॅकफुटला फेकली गेली.. पण लोकसभेच्या निकालात उमरग्यातून तब्बल 43 हजारांचं लीड मशालीच्या पाठीशी राहिल्यामुळे आता ठाकरे गटातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत… अशोकराजे सरवदे, रमेश धनशेट्टी, विरपक्ष स्वामी या सगळ्यांची नावं चर्चेत असली तरी प्रा. डॉ. संजय कांबळे Multiple 2 हे यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर आहेत… चळवळीत काम करण्यापासून ते राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता ज्ञानराज चौगुले यांना ते कट टू कट लढत देतील…बाबा पाटील, ओमराजे आणि इतर अनेक नेत्यांशी त्यांचे असणारे संबंध पाहता धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा सद्यस्थितीत पाहायला मिळणाऱ्या लढतीत मशालीला अप्पर हँड आहे..

आता पाहूयात शेवटचा आणि चौथा मतदारसंघ तो म्हणजे परंडा विधानसभा… भूम परंडा हा विधानसभा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा…राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंनी 2004 पासून सलग तीन टर्म भूम परंडाची आमदारकी पटकवली… शिवसेना प्रत्येक वेळेस इथून जिंकण्यासाठी फोर्स लावत आली… पण परंड्यात होणारा मत विभाजन हे मोटेंच्या पथ्यावर पडत आलं… पण 2019 ला तानाजीराव सावंतांनी शिवसेनेतील वाढवलेली पत पाहून जनतेतून निवडून जाण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे विधान परिषदेवर असणारे तानाजीराव सावंत यांनी परंड्यातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली… मतदारसंघातला मोटे विरुद्ध सावंत असा झालेला आतापर्यंतचा सर्वात अटीतटीचा सामना… सावंत यांच्या विकास कामांचा धडाका, पक्षात असलेलं वजन आणि युतीची साथ यामुळे मतदारसंघातील मोटेंच्या वर्चस्वाला धक्का देत सावंतांनी अखेर शिवसेनेचा भगवा झेंडा भूम परंडामध्ये फडकवलाच… पण पुढे तानाजीराव सावंत हे शिवसेनेच्या बंडावळेस शिंदे गटात गेले… मंत्री झाले… यानंतर त्यांच्या इमेजला मोठा डॅमेज बसू लागला… आधी गद्दारीचा टॅग Tanajirao Sawant Angry त्यानंतर मंत्रिपदावर असताना केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य यामुळे सावंत टारगेट झाले… मराठा आरक्षणावर त्यांनी केलेल्या कमेंटमुळेही त्यांची बरीच अडचण झाली… हे कमी होतं की काय म्हणून या मंत्री महोदयांच्या मतदारसंघातूनच मशालीला दोन नंबरचं लीड मिळालंय… थोडक्यात धनशक्तीने तगडे आमदार असणाऱ्या सावंतांची आमदारकी सध्यातरी धोक्यात आहे… त्यात राहुल मोटे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्यामुळे भूम परंड्यात ‘राहुलभैया फिरसे’ असं वार सध्या तरी दिसतंय… बाकी रणजीत दादा पाटील की राहुल मोटे? हा निर्णय महाविकास आघाडीला घ्यावा लागणार आहे… तर अशी आहे सध्याची धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभांच्या संभाव्य चार लढती… आणि त्यांचा संभाव्य निकाल…बाकी धाराशिवमध्ये निकाल कसा लागेल? याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा?