जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार; हिंदू महासभेची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार” असे धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

बुधवारी राष्ट्रवादीच्या एका सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम हे शाकाहारी नाही तर मांसाहारी होते असा ठोस दावा केला. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात देखील नवा वाद निर्माण झाला. आता या वक्तव्याप्रकरणीच जालन्यात हिंदू महासभेने आक्रमकाची भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, “बारामतीच्या मटणाच्या तुकड्यावर जगणारे दोन तोंडी जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्याला हिंदू महासभा सर्वोच्च धर्मयोद्धा या पुरस्काराने सन्मानित करणार आहे”

त्याचबरोबर, “शरद पवार साहेबांच्या कृपेने जगणारे आमदार जितेंद्र आव्हाड लोकांना खुश करण्यासाठी, काही लोकांच्या दाढ्या कुरवळण्यासाठी वारंवार भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, देवी देवतांवर ते टीका टिप्पणी करत असतात. प्रसिद्धीच्या झोक्यात येण्यासाठी ते असे करत असतात. ज्या प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगला त्यांच्याविषयीच जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यामुळे याची त्यांना लाज वाटली पाहिजे” असे धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटले.

दरम्यान, प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, “मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही”