धीरुभाई अंबानी यांनी कुटुंबियांसाठी ठेवली होती ‘इतकी’ मोठी संपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक, उद्योगपती धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani)यांची आज (28 डिसेंबर) 91 वी जयंती असून त्यांनी दिलेले उद्योग क्षेत्रातील योगदान आणि आपल्या कुटुंबियांसाठी ठेवलेली संपत्ती याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. धीरुभाई अंबानी हे गुजरातमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मले. त्यांना प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करावा लागला. व्यावसायिक म्हणून सुरुवात करताना त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला, तो सोपा नव्हता. हलाखीच्या परिस्थितीमुळे ते फक्त मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेऊ शकले. शाळा सोडल्यानंतर त्यांनी येमेनला जाऊन पेट्रोल पंपावर काम केले. संघर्ष करून रिलायन्सची स्थापना केली. परंतु त्यांच्या मृत्यूच्या वेळी धीरुभाई अंबानी यांनी त्यांची दोन मुले मुकेश व अनिल अंबानी यांच्यासाठी नेमकी किती संपत्ती ठेवली होती ? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

धीरुभाई अंबानींनी कुटुंबियांसाठी नेमकी किती संपत्ती ठेवली ?

जगातील 138 व्या श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या धीरुभाई अंबानींचे निधन 2002 मध्ये झाले. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, 2002 मध्ये त्यांच्या संपत्तीचे मूल्य 2.9 अब्ज डॉलर होते. सद्यस्थितीत डॉलरच्या मूल्यानुसार भारतीय रुपयात ते मूल्य साधारणत: 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन 17.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असावे असा अंदाज आहे. धीरुभाई यांच्या कारकिर्दीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन 60 हजार कोटींवर झाले होते.

धीरूभाई अंबानी यांच्या कारकिर्दीतील महत्वाचे टप्पे

गुजरातमधील चोरवाड गावात रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता. येमेनमधील पेट्रोल पंपावर त्यांनी सर्वप्रथम काम केले. 1958 मध्ये ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक क्षेत्राला सुरुवात केली. 1966 मध्ये, धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना करून तिचे भारतातील आघाडीचा उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये रुपांतर केले. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज 1977 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झालेली पहिलीच भारतीय उद्योग कंपनी होती.

धीरूभाई अंबानींनी कापड उद्योग ते पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग, तेल, दूरसंचार आणि इतर क्षेत्रांपर्यंत आपला उद्योग विविध क्षेत्रांत व्यापक केला. विविध उद्योगांमध्ये रचनात्मक कार्य करून रिलायन्स इंडस्ट्रीजला प्रतिष्ठा दिली. त्यांनी नेहमीच उद्योजकतेचे समर्थन केलं. तसेच कौशल्यपूर्ण व्यक्तींना संधी देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यावर त्यांचा भर होता. लघु, सूक्ष्म गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावून धीरूभाईंनी भारताच्या आर्थिक विकासाला एकप्रकारे हातभार लावला आहे. औद्योगिक धोरणातील कुशाग्रता, भांडवली बाजारातील सातत्याचे प्रयत्न आणि संसाधनांचा वापर करण्याची बुद्धी या जोरावर धीरूभाई भारतातील उद्योग क्षेत्रातील ऐतिहासिक व्यक्तीमत्व बनले. धीरूभाई अंबानी यांनी उद्योग क्षेत्रातील केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना भारतातील प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. धीरुभाई अंबानी यांनी उद्योगजगतात केलेली प्रगती, उद्योग जगतातील बदललेले परिमाण आणि भारतीय व्यावसायिक क्षेत्रात दिलेले योगदान विद्यमान उद्योजकांना प्रेरणादायी ठरले आहे.