10 मेपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलसाठी ‘कॅश ओन्ली’ ! पंप चालकांचा डिजिटल पेमेंटला विरोध का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Digital Payment Ban On Petrol Pump : सध्या डिजिटल पेमेंट सिस्टीमला सर्वत्र प्राध्य दिले जात असले तरी राज्यातील एका जिल्ह्यात पेट्रोल पम्पावर कॅश व्यवहार करूनच पेट्रोल भरावे लागणार आहे. कारण सायबर फसवणुकीमुळे बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी 10 मेपासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना (Digital Payment Ban On Petrol Pump ) अडचणींचा सामना करावा लागणार असून, पेट्रोल डीलर्स संघटनेने हा संघर्ष राज्यभर नेण्याचा इशारा दिला आहे.

डिजिटल इंडिया मोहिमेने देशभरातील व्यवहार डिजिटल पद्धतीने होण्यास प्रोत्साहन दिलं असलं, तरी या प्रणालीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी कठोर पावलं उचलली आहेत. विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार 10 मे 2025 पासून नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर (Digital Payment Ban On Petrol Pump ) डिजिटल पेमेंट—जसे की UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट स्वीकारलं जाणार नाही.

या निर्णयामागील पार्श्वभूमी गंभीर आहे. विदर्भात काही सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांनी फसवणूक करून विविध खात्यांमधून पैसा फिरवून शेवटी तो पेट्रोल भरण्यासाठी वापरला. या व्यवहारांमध्ये संबंधित ग्राहक व पंप चालकांचा प्रत्यक्ष संबंध नसतानाही, पोलिसांच्या सायबर पथकाने आणि बँकांनी पंपचालकांची खाती गोठवली. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, “आम्ही केवळ सेवा देतो आणि ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलमधून किंवा कार्डद्वारे पेमेंट केलेलं स्वीकारतो. त्यानंतरही आमच्या खात्यांवर बंदी घालणे हा अन्याय आहे. ही केवळ आर्थिक अडचण नाही, तर व्यवसायावर प्रत्यक्ष आघात आहे.”

काही प्रकरणांमध्ये पंपचालकांचे लाखो रुपयांचे व्यवहार अडकले आहेत आणि संपूर्ण बँक खाती गोठवण्यात आली आहेत. संबंधित रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया फारच गुंतागुंतीची असून, अनेकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा (Digital Payment Ban On Petrol Pump )

डिजिटल पेमेंटबाबतचा हा निर्णय सध्या फक्त नागपूर जिल्ह्यात लागू होणार असला तरी, लवकरच त्याचा व्याप संपूर्ण विदर्भ आणि पुढे महाराष्ट्रभर होऊ शकतो. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला नाही आणि अन्यायकारक कारवाई थांबवली नाही, तर ते राज्यभरातील पंपांवर देखील डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

ग्राहकांच्या अडचणी वाढणार

सामान्य ग्राहकांसाठी ही परिस्थिती निश्चितच अडचणीची ठरणार आहे. देशभरात बहुतांश व्यवहार आता डिजिटल स्वरूपात होतात. पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंटची सोय बंद झाल्यास नागरिकांना रोख रक्कम घेऊनच पंपावर जावं लागणार आहे, जे प्रत्येकवेळी शक्य नसेल.

सरकारकडे मागणी (Digital Payment Ban On Petrol Pump )

पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केंद्र व राज्य सरकारकडे, तसेच बँकिंग व्यवस्थेकडे मागणी केली आहे की सायबर फसवणुकीप्रकरणी निष्पाप व्यावसायिकांना दोषी ठरवू नये. गुन्हेगारांना शोधण्याचे काम पोलिसांचे आहे; त्याऐवजी बँका खातं गोठवण्याचा सरळ मार्ग निवरत आहेत, जे चुकीचे आहे.

डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणात सायबर सुरक्षेचा प्रश्न उभा राहत असताना, त्याचे बळी निष्पाप व्यावसायिक ठरत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होतो आहे. सरकारने या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष घालून सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण केला नाही, तर डिजिटल व्यवहारांची विश्वसनीयताच धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे.