हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकला अगदी लागूनच असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ (Dindori Lok Sabha 2024)…महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात फारसा चर्चेत असलेला हा मतदारसंघ मात्र 2019 मध्ये फुल फोकस मध्ये आला. आणि त्याला कारण ठरली भाजपची एक मोठी खेळी.. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती पवार (Bharati Pawar) यांना पाडण्यासाठी पक्षाने जी काही सारी यंत्रणा कामाला लावली होती. त्याच भाजपने 2019 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर त्याच राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना भाजपने तिकीट देत निवडून आणल. एवढेच नव्हे तर खासदारकीच्या पहिल्याच टर्मला केंद्रीय राज्यमंत्रीपदही देऊ केलं. भाजपने 2009 पासून सलग दोन टर्म निवडून आलेल्या हरिश्चंद्र पवार यांचं तिकीट कापण्याचं धक्कातंत्र दिंडोरी लोकसभेत का वापरलं? नव्या नवख्या उमेदवाराला थेट कॅबिनेट मंत्री देण्याइतपत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नेमकं काय दडलंय? येथे निवडणुकीत भाजपकडून भारती पवार खासदारकीच्या उमेदवार असतील की याही वेळेस आयत्या वेळेस भाजप काही वेगळा डाव टाकणार?
जवळपास 15 लाखांहून अधिक मतदार असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघ, कळवण विधानसभा मतदारसंघ, चांदवड विधानसभा मतदारसंघ, येवला विधानसभा मतदारसंघ,निफाड विधानसभा मतदारसंघ आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश होतो. नांदगावमधून शिंदे गटात असलेले सुहास कांदे, कळवणमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नितीन पवार, चांदवडमधून भाजपचे राहुल आहेर,येवल्यातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ,, निफाडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर, दिंडोरीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हे विद्यमान आमदार आहेत. याचाच अर्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार, भाजप एक, शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार असं सरळ साधं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे गणित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्या फळीतील अनेक नेते याच मतदार संघातून निवडून येतात. त्यामुळे सर्वपक्षीयांसाठीच दिंडोरीची जागा महत्त्वाची ठरते.
2009 च्या लोकसभा पुनर्रचनेत मालेगाव लोकसभा मतदारसंघाचा काही भाग हा धुळे लोकसभा मतदारसंघात गेला. आणि उरलेल्या नव्या कोऱ्या भागातून दिंडोरी हा मतदारसंघ अस्तित्वात आला. मतदार संघात आदिवासींची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. 2009 च्या पहिल्याच निवडणुकीत मूळचे राष्ट्रवादीचे असणारे हरिश्चंद्र पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करून विजयश्री खेचून आणला. पुढे 2014 मध्ये सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना चितपट करून हरिश्चंद्र पवार खासदार झाले. पुढे 2019 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार हरिश्चंद्र पवार हेच मुख्य लढतीत असतील असं सरळ साधं गणित असताना भाजपने धक्का तंत्राचा अवलंब करत हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्यास सांगितलं. यामुळे हरिश्चंद्र पवार कमालीचे नाराज झाले.
मात्र भाजपच्या हायकमांड पुढे कुणाचंच काही चालत नाही, हाही इतिहास आहेच. त्यामुळे आधीच मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल असताना आणि त्यात मोदी लाटेचा प्रभाव असल्यामुळे भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी 5 लाख 67 हजार 470 मतं मिळवत राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांना सरळ चितपट केलं. पहिल्याच प्रयत्नात भारती पवार लोकसभेच्या खासदार झाल्या. हे कमी होतं की काय म्हणून मंत्रिमंडळ विस्तारात पवार यांची थेट कॅबिनेट राज्यमंत्रीपदी वर्णी लागली.
डॉ. भारती पवार या कळवणचे दिग्गज आमदार दिवंगत ए.टी. पवार यांच्या सून. तर, त्यांचे दीर नितीन पवार हे कळवणमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यात अजितदादांच्या फुटीनंतर दिंडोरी मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीच्या बाजूने आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी येत्या निवडणुकीत हा मोठा सेटबॅक ठरणार आहे. गतवर्षीचे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असणारे धनराज महाले यंदा शिंदे गटात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार चाचपडण्याच्या खेळात मोठी कसरत करावी लागणार आहे. मात्र भाजपला या मतदारसंघात तोडीस तोड उत्तर द्यायचं झालं तर शरद पवार यांनाच काही करिष्मा करावा लागेल. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या फोकसवर नाशिक जिल्हा राहिलाय. शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग इथे कार्यरत आहे. त्यामुळे त्याला थोडसं ॲक्टिव्ह करून सोबत ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळाली तर दिंडोरी मतदारसंघात बराच बदलही घडून येऊ शकतो.
ज्याप्रमाणे राज्यातील काही मतदारसंघात वंचित गेमचेंजर ठरतो. अगदी त्याचप्रमाणे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ही भूमिका लाल बावटा पार पाडतो. 2019 च्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जीवा पांडू गावित यांना तब्बल 1 लाख 9 हजार 570 मते मिळाली होती. यावरून त्यांची मतदारसंघावरील प्रभावाची कल्पना आपल्याला येऊ शकते. पांडू गावित हे सुरगाणा-पेठमधून सहा वेळेस आमदार होते. त्यामुळे यंदा निवडणूक दुहेरी झाली. आणि ही लाल बावट्याची मते महाविकास आघाडीची ताकद बनली तर कदाचित निकालाचं चित्र काही वेगळं पाहायला मिळू शकतं. भाजपसाठी ही जागा निवडून येण्यासाठी सोपी असली तरी विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर बरीचशी नाराजी आहे. पवार या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून पुरेसा निधी मतदारसंघात आला नसल्याची टीका त्यांच्यावर वारंवार करण्यात येते. आरोग्य, रस्ते, पाण्याची सुविधा आणि शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधांपासूनही दिंडोरी वंचित आहे. त्यामुळे भारती पवारांचा पत्ता कट झालाच तर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिकच्या माजी महापौर रंजना भांसी यांचाही विचार पक्षश्रेष्ठींकडून तिकीट वाटपाच्या वेळेस केला जाऊ शकतो. हा मतदारसंघ आदिवासी असल्याने आदिवासींचा महत्वाचा वनजमिनीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न दिंडोरी जिंकण्यासाठी महत्त्वाचे की फॅक्टर ठरतात.
त्यामुळे तसा इतिहास पाहिला तर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरीत यंदा मात्र महाविकास आघाडी आणि सोबतच माकपच्या साथीने चांगलीच चुरस पाहायला मिळणारय. त्यामुळे तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष निवडणूक होऊन निकाल येईपर्यंत दिंडोरीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते हाय कमांड पर्यंत सर्वांचीच धाकधूक वाढलेली दिसेल. दिंडोरीचा यंदाचा खासदारकीचा मान कोणाला? तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…