कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मंद्रुळकोळे येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक परिवर्तन संस्थेने पक्षांसाठी अन्न- पाण्याची पात्रे नागरिकांना वाटून आपल्या कार्याचा प्रारंभ केला. येथे नुकत्याच राबवीलेल्या या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. मंद्रुळकोळेचे सुपूत्र, सामाजिक कार्याची विशेष आवड असलेले राजपत्रित निवृत्त वनाधिकारी वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेमार्फत विविध उपक्रमातून समाजातील गरजूना आधार देवून सामाजिक परिवर्तनात आणि विकासात योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
उन्हाळ्यात अन्न व पाण्यावाचून छोट्या-मोठ्या पक्षांचे खूप हाल होतात, त्यांची तडफड थांबविण्यासाठी संस्थेने पक्षांसाठी चारा पाण्याची पात्रे नागरिकांना वाटून आपल्या कार्याचा प्रारंभ केला. येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. संस्थापक वसंतराव पाटील, पुनर्वसन प्राधिकरणचे सदस्य जगन्नाथ विभुते, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष गणेश कारंडे, उपाध्यक्ष सुधीर देसाई, मनीषा ढेब, शकुंतला पाटील, बी आर पाटील, तनवीर मकानदार, वैभव पाटील, उषा जाधव, हिंदुराव पाटील, दयानंद जाधव, प्रतिभा कांबळे आदींसह विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.
वसंतराव पाटील म्हणाले, ‘आपणही समाजाचे काही देणे लागतो या जाणीवेने या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेच्या माध्यमातून आश्रित अनाथ अपंगांना मदत, वृक्षलागवड, रोपे वाटप, पर्यावरण संरक्षण, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मदत करुन शिष्यवृत्ती देणे, मोफत पुस्तके व गणवेश वाटप अपंग मतिमंद मूकबधिरांना मदत, गरजूंना वैद्यकीय मदत आरोग्य विषयक शिबिरे, रक्तदान शिबिर, नेत्रदान आदी उपक्रम राबविण्यासह राष्ट्रीय एकात्मतेकरिता जनजागृती तसेच दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त, पुरग्रस्तांना मदत करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रास्ताविक व स्वागत सुधीर देसाई यांनी केले. आभार गणेश कारंडे यांनी मानले.