हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धक्का देत सत्ता काबीज केली आहे. कर्नाटकची निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही नेत्यांनी अत्यंत प्रतिष्टेची केली होती. दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेतेमंडळींनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावला होता. परंतु काँग्रेसने यावेळी दणदणीत यश मिळवले आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस तब्बल १३६ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप फक्त ६५ जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या या विजयाचे खरे नायक ठरले आहेत ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष डिके शिवकुमार… काँग्रेसच्या कठीण परिस्थितीत आणि अडचणीच्या काळात प्रत्येक वेळी डिके शिवकुमार पक्षाच्या आणि गांधी कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिले आहे.
कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम डिके शिवकुमार यांनी केलं आणि भाजपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. डिके शिवकुमार यांनी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा काँग्रेससाठी संकटमोचकाचे काम केलं आहे. तुम्हाला माहीत नसेल किंवा खरं वाटणार नाही परंतु डिके शिवकुमार यांनी एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही सरकार वाचवलं होत. २००२ ला महाराष्ट्रात विलासराव देशमुखांचं सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, त्यावेळी राज्यातल्या ४० काँग्रेस आमदारांना डीके शिवकुमार यांच्या देखरेखीखाली बेंगलोरच्या एका रिसॉर्टमध्ये सुरक्षितपणे ठेवलं गेलं. त्यामुळे तेव्हा विलासराव देशमुख यांचं सरकार वाचलं होतं.
डिके शिवकुमार यांच्या गांधी घराण्याच्या निष्ठेबद्दल सुद्धा कोणी शंका उपस्थित करू शकत नाही. महत्वाचे म्हणजे राजकारण करायला जे काही लागत, म्हणजे पैसे, पद, लोकांची साथ आणि मुख्य म्हणजे पक्षाशी एकनिष्ठता… हे सर्वकाही डिके शिवकुमार यांच्याकडे आहे. देशात सर्वात जास्त संपत्ती असलेल्या राजकारण्यांमध्ये डीके शिवकुमार यांचा समावेश होतो. 2018 मध्ये त्यांची संपत्ती 840 कोटी रुपये होती. जे आता सुमारे 1413 कोटी रुपये झाली आहे. २०१९ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना दिल्लीत अटकही केली होती. मात्र त्यातून सुटका झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काँग्रेसचे काम जोमाने करू लागले आणि आज ते कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.