‘वटवृक्ष’ चिन्ह शरद पवार गटाला देऊ नये; विश्व हिंदू परिषदेची आयोगाकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा प्रस्ताव मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव मांडल्यानंतर बुधवारी शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे पक्षासाठी नवीन नाव मिळाले. मुख्य म्हणजे, आता नाव मिळाल्यानंतर शरद पवार गट चिन्ह मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे समोर आले आहे.

अजित पवार यांच्या गटाकडे घड्याळ चिन्ह गेल्यानंतर शरद पवारांचा गट वटवृक्ष या चिन्हाची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे विश्व हिंदू परिषदेने या मागणीला विरोध दर्शवला आहे. तसेच शरद पवार गटाला वटवृक्ष चिन्ह देण्यात येऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मागील 60 वर्षांपासून हिंदू परिषदेचा नोंदणीकृत लोगो वटवृक्ष आहे. त्यामुळेच हा लोगो दुसऱ्या कोणाला देण्यात येऊ नये, अशी भूमिका परिषदेने मांडली आहे.

याबाबतची माहिती देत विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे की, “सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रोसेसमध्ये त्यांना जो लोगो दिला जातोय तो वटवृक्षाचा लोगो आहे. मात्र मागील 60 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचा हा नोंदणीकृत लोगो आहे. विहिंपने धार्मिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाला हा लोगो दिला तर संभ्रम निर्माण होईल. म्हणून निवडणूक आयोगाने कुणालाही वटवृक्षाचा लोगो देऊ नये”

दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील अजित पवार गटाला सुपूर्त केले आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आयोगाने दिलेल्या निकालाला आवाहन करत शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. परंतु यापूर्वीच अजित पवार गटाकडून मागणी करण्यात आली आहे की, “विरोधी पक्षाकडून दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्यावी.”त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निकाल देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.