वास्तव कट्टा | मयुर डुमणे, उस्मानाबाद
समाजात वावरताना पुरूषप्रधानता सहज दिसून येते. आज मेसवर गेलो होतो. मेसच्या काकू लंगडत चलत होत्या. मी विचारलं काय झालं काकू? काकू म्हणाल्या नवऱ्याने मारलंय. नुकताच थप्पड चित्रपट पाहिल्यामुळे मला त्या क्षणी चित्रपटात दररोज नवऱ्याचा मार खाणारी ती महिला आठवली. काकुला नवऱ्याने का मारलं याच कारण विचारलं. काकू म्हणाल्या, घराबाहेर बसले होते म्हणून मारलं. काकू मेस चालवतात. त्यांचा नवरा घराबाहेर बोन्बलत फिरतो. घराबाहेर काय करतो हे काकूंनाही माहिती नाही. लहर आली की काकुना मारतो. काकूंनी नवऱ्याच्या या हाणामारीची सवय करून घेतलीय. माझ्यासोबत एक कॉलेजवयीन मुलगीही जेवत होती. तिला हा प्रकार काय सहन झाला नाही. ती म्हणत होती. कमवायच तुम्हीच, घर सांभाळायचं तुम्हीच आणि वरून मार पण खायचा. काकू तुम्ही पोलिसांत जा. मुलीच्या या प्रश्नावर काकूंनी हसून दाद दिली. मुलगी आपलं दुःख समजून घेतेय हे ऐकून काकूंनी तिला जवळ बोलवून घेतलं. काकूंना एक 7 वीत जाणारी मुलगी आहे. काकू सांगत होत्या. मी जर नवऱ्याला सोडलं तर हीच कसं होणार. हिच्याशी कोण लग्न करणार. नवऱ्याला सोडलं तर त्यांच्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही असा काकूंचा समज होता. मी काकूंना समाज कसा बदलतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण काकूंना समाज आहे तसाच आहे असं वाटत होतं. कुटुंब टिकविण्यासाठी बाईने सहन केल पाहिजे अस काकूंच म्हणणं.
काकू या समाजातील एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. त्यांच्यासारख्या अशा लाखो स्त्रीया नवऱ्याकडून होणारी मारहाण, अत्याचार अजूनही सहन करतात.
बाईला माणूस म्हणून या समाजात अजूनही किंमत दिली जात नाहीय. काकूंना त्यांच्या लहानपणी अनेक बंधनात जगावं लागलं. आता मी माझ्या मुलीला या बंधनात नाही जगू देणार हेच काकूंच वाक्य थोडाफार आशावाद निर्माण करणार आहे.
लग्न करणे, घर सांभाळणे, नवऱ्याची सेवा करणे, मुलांना जन्म देणे अशा पारंपरिक चौकटीत जगणाऱ्या तिलाही इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आहेत याचा विचारच पुरुषप्रधान व्यवस्थेत केला जात नाही. या सर्वांशी तडजोड करून ती संसार टिकविण्यासाठी जगते मात्र तरीही तिला दुय्यमच लेखले जाते. पुरुषांची स्वप्ने, इच्छा, करिअर पूर्ण करण्यासाठी स्त्रिया जन्माला आल्या असा समज असलेल्या समाजात स्त्री ही देखील माणूस आहे तिलाही भावना, इच्छा, करिअर, स्वप्ने आहेत.संसार टिकविण्यासाठी स्त्रीनेच कशी तडजोड केली पाहिजे, तिनेच कायम पडती भूमिका घेतली पाहिजे हे सांगणाऱ्या स्त्रीया देखील या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या वाहक आहेत. थप्पड चित्रपटात त्याने लगावलेली थप्पड हे फक्त निमित्त आहे. तिला गृहीत धरलं जातं, तीच माणूस म्हणून असलेलं अस्तित्व नाकारलं जातं इथं खरी गोम आहे.सतत गृहीत धरल्या जाणाऱ्या तिचा अखेर स्वाभिमान जागा होतो आणि ती या पुरूषप्रधान व्यवस्थेला एक जोरात थप्पड लगावते.
स्त्रीच्या जगण्यापासून ते मरण्यापर्यंत इथली पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रीवर कायम अन्याय करते आणि सहनशील स्त्री समाजाच्या भीतीपोटी तो अन्याय सहन करत राहते. ही परिस्थिती आता बदलायची वेळ आली आहे.
लग्न करणं, नवऱ्याची सेवा करणं, स्वयंपाक करणं, भांडी धुणी धूण, बाळाचा सांभाळ करणं ही पारंपरिक चौकट मोडण्याची वेळ आता आली आहे. ही कामे पुरुषांनीही केली पाहिजेत. ती काळाची गरज आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीची गरज आहे. कारण ती शिकतेय, स्वावलंबी होतेय, तिला तिच्या अधिकारांची जाणीव होतेय. कमावती झाल्यामुळे तिच्याकडे निर्णय स्वातंत्र्यही येत आहे. कोणत्या मुलासोबत लग्न करायचं हे आता तिचे आई वडील ठरवत नाहीत. तर आई वडिलांना विश्वासात घेऊन ती स्वतः आपला जोडीदार निवडतेय. मला इथे सांगायला आनंद होतोय की मी जिथे काम करतो तेथील माझे वरिष्ठ स्वतः उत्तम स्वयंपाक करतात. घरकाम कमी दर्जाचं आणि ऑफिसच काम खूप महत्वाच ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. घरकाम कमी दर्जाचं असणाऱ्या पुरुषांनी एक सर्व घरकाम करून बघितलं पाहिजे. हा बदल आहे. हा बदल हळूहळू होत जाणारा आहे. आपण या बदलाचा भाग बनू या आणि या समाज परिवर्तनाच्या लढ्यात छोटंस योगदान देऊ या.
मयूर डुमणे (7775957150)