हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज १५ ऑक्टोबर … भारताचे मिसाईल मॅन अशी ओळख असलेले महान वैज्ञानिक आणि देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती … एका नावाड्याचा मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती अशी डॉ. कलामांची ही वाटचाल नक्कीच प्रेरणादायी आहे. शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवा यांच्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. डॉ. कलाम यांच्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत चैतन्य, नवं काही शिकण्याची आणि शिकवण्याची उर्जा कायम होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवनप्रवास ….
डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम होते. तिरूचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेज मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. एपीजे अब्दुल कलाम यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला आणि त्यांच्या आयुष्यातील पुढील चार दशके वैज्ञानिक आणि विज्ञान प्रशासक म्हणून घालवली. कलाम हे प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये सहभागी होते आणि भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा सखोल सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.
1992 ते 1997 पर्यंत कलाम हे भारतीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. 1998 च्या अण्वस्त्र चाचणीत कलाम यांच्या महत्त्वाच्या भूमिकेने अणुशक्ती म्हणून भारताचे स्थान मजबूत केले 1998 मध्ये, कलाम यांनी टेक्नॉलॉजी व्हिजन 2020 प्रस्तावित केले, 20 वर्षात भारताला विकसनशील समाजातून विकसित समाजात रूपांतरित करण्यासाठी त्यांनी एक रणनीती आखली होती. कृषी उत्पादकता वाढवणे, आर्थिक वाढीचे इंजिन म्हणून तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे आणि आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा विस्तार करणे यांचा यामध्ये समावेश होता.
साल 2002 मध्ये अब्दुल कलाम यांची भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती म्हणून एक टर्म पूर्ण केल्यांनतर त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनाकडे वळवला . अब्दुल कलाम यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले होते.
27 जुलै 2015 रोजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग येथे “क्रिएटिंग अ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ” या विषयावर व्याख्यान देण्यासाठी अब्दुल कलाम शिलाँगला गेले होते. त्यावेळी आपल्या भाषणादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते अचानक कोसळले. यामध्येच त्यांचे निधन झालं.