चंदेरीदुनिया । ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आज आपल्यात नाहीत. वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. तब्बल चार दशके मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉ. लागू यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी अनेक हिंदी व मराठी सिनेमांत काम केले. पण ते रंगभूमीवर अधिक रमत. मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी काम केले. एका मुलाखतीत डॉ. लागू यांनी रंगभूमीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती.
‘मी हिंदी सिनेमात काम करू लागलो आणि हळूहळू रंगभूमी दुरावू लागली. एक वेळ अशी आली की, माझ्याकडे नाटकाकडे अजिबात उसंत नव्हती. त्याक्षणी माझे काहीतरी चुकतेय, ही जाणीव मला बोचू लागली. रंगभूमी माझा श्वास होता. तो थांबता कामा नये, असे मला जाणवले आणि मी पुन्हा रंगभूमीकडे वळलो. दर रविवारी मी नाटक करायचो आणि उर्वरित सहा दिवस सिनेमांत काम करायचो,’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली होती. याचमुळे आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कॅनडा आणि इंग्लंडला जावे लागले. १९६०च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. पण भारतात असताना मात्र पुण्यातील पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि मुंबईतील रंगायन या संस्थेद्वारे त्यांचे रंगमंचावरील काम सुरू होते. अखेर १९६९मध्ये वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. ही भूमिका अजरामर झाली.