औरंगाबाद : मुंबई-पुणे पाठोपाठ औरंगाबादेतही सोमवारपासून ड्राईव्ह इन लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रोझोन मॉलच्या पार्किंग मध्ये हे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
महापालिकेकडून शहरात सुमारे 70 केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या केंद्रावर सध्या 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. लसीकरणाला प्रतिसाद मिळावा, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर ताटकळत बसावे लागू नये यासाठी मनपाने ड्राईव्ह इन ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे.
त्यानुसार कारमधून आलेल्या नागरिकांना कारमध्येच लस टोचली जाणार आहे. कार्स हे इतर चार चाकी वाहनांमधून आले तसेच रिक्षामधून आलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. एपीआय कॉर्नर जवळील प्रोझोन मॉलच्या दोन्ही पार्किंग लसीकरणाचा ड्राईव्ह इनसाठी वापरण्यात येणार आहेत. पार्किंग मध्येच लस घेतलेल्या नागरिकांना अर्धा तास थांबावे लागेल. लस घेण्यासाठी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे लागेल. सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येईल असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.